मूकी व बहिरी असलेली भारतीय मुलगी गीता पंधरा वर्षांंपूर्वी चुकून पाकिस्तानात गेली होती, ती अखेर भारतात परतली. कराचीहून या मुलीला घेऊन आलेले विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा पाकिस्तानी उच्चायुक्तालय व भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीताची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला १ कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, गीताने कुटुंबीयांना भेटल्यानंतर ते आपले आईवडील असल्याचे सूचित केलेले नाही, थोडक्यात आईवडिलांची ओळख पटलेली नाही. असे असले तरी भारत तिची काळजी घेईल. महातो कुटुंबीय हे माझे नाहीत असे गीताने स्पष्ट केले व तिने त्यांना ओळखले नाही. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या दोन डॉक्टरांवर गीताच्या जनुकांचे नमुने घेण्याचे काम सोपवण्यात आले असून त्यातून तिचे आईवडील तेच आहेत का हे समजणार आहे, या चाचणीचे निष्कर्ष येण्यास १५-२० दिवस लागणार आहेत.
गीता, तू आमची कन्या आहेस, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले असून त्यांनीही गीताची भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, माझे मन नेहमी भारतातच होते असे गीताने सांगितले. तिच्या समवेत तिला दत्तक घेतेलल्या एधी फाउंडेशनचे पाच सदस्य पाकिस्तानातून आले आहेत. पांढरी- लाल सलवार कमीझ व दुपट्टय़ाने झाकलेले डोके अशा वेशात ती आली. लोकांना तिने अभिवादन केले. पाकिस्तान उच्चायुक्तालयाने गीताच्या सन्मानार्थ भोजन ठेवले होते, असे पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाचे प्रवक्ते मंझूर अली मेमन यांनी सांगितले. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने असे म्हटले आहे की, याच प्रेमाने भारतही पाकिस्तानच्या ४५९ कैद्यांना सोडून देईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही देशांसाठी हा आनंदाचा, चांगल्या संदेशाचा दिवस आहे. आम्ही गीताला भारताच्या ताब्यात दिले आहे. पाकिस्तानी उच्चायुक्त व त्यांच्या पत्नीने गीताच्या स्वागतार्थ भोजन आयोजित केले आहे. गीता भारतातून पाकिस्तानात गेली तेव्हा ७-८ वर्षांची होती व पंधरा वर्षांपूर्वी ती पाकिस्तानी रेंजर्सला सापडली होती. नंतर तिला एधी फाउंडेशनने दत्तक घेतले व नंतर ती कराचीत रहात होती. बिलकीस व त्यांचे नातू सबा व साद एधी आज तिच्यासमवेत येथे आले. सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटामुळे गीताची ही कहाणी पुम्ढे आली होती. भारतीय उच्चायुक्त टी.सी.ए.राघवन व त्यांच्या पत्नीने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या सांगण्यावरून गीताची भेट घेतली होती. कराची येथे विमानात बसण्यापूर्वी गीताने पाकिस्तानी लोकांचे आभार मानले. एधी फाउंडेशनचे फैजल एधी यांनी कराची येथे सांगितले की, समाजमाध्यमातून आम्ही गीताच्या संपर्कात राहू. तिला भेटू. ती आमच्यातून वेगळी झाली आहे असे आम्हाला वाटत नाही. गीता हिने वडील, सावत्र आई व भावंडांना ओळखले आहे. एक छायाचित्र भारतीय उच्चायुक्तालयाने पाठवले होते त्यावरून तिचे कुटुंबीय बिहारचे असल्याचे समजले आहे. डीएनए चाचणी केल्यानंतर गीताला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.