हवा प्रदूषण व जनुकांमुळे नैराश्याचा धोका

हवा प्रदूषणामुळे नैराश्याचे प्रमाण जास्त वाढत जाते व जनुकांचे आविष्करण विपरित होऊ लागते.

वॉशिंग्टन : हवा प्रदूषण तसेच जनुकांमुळे नैराश्याचा धोका वाढतो असे एका संशोधनात दिसून आले आहे. काही लोकांमध्ये जनुकीय परिस्थिती आधीच नैराश्याला अनुकूल असते व त्यात प्रदूषणामुळे भर पडते असे दिसून आले आहे.

पीएनएएस नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, हवा प्रदूषण, मेंदूचे प्रतिमा चित्रण, मेंदूतील जनुकांचे आविष्करण हे सगळे घटक यात महत्वाचे असून त्यांचा या संशोधनात विचार करण्यात आला. एकूण ४० देशांच्या इंटरनॅशनल जेनेटिक कन्सोर्टियम या  संस्थेने पुरवलेल्या माहितीचा वापर करण्यात आला आहे.

या संशोधनाबाबत अमेरिकेतील लायबर इन्स्टिटय़ूट फॉर ब्रेन डेव्हलपमेंट या संस्थेचे हाव यांग तान यांनी म्हटले आहे की, हवा प्रदूषणामुळे मेंदूतील आकलन, भावना  याबाबतच्या चेतापेशींच्या जोडण्यांवर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे जनुकांचे आविष्करण बदलून ते नैराश्यास अनुकूल बनते. जास्त प्रदूषण असलेल्या भागातील लोकांना नेहमीच नैराश्याचा अनुभव येत असतो कारण प्रदूषणामुळे त्यांची जनुके बिघडतात व त्यांचे वर्तन  विपरित होऊ लागते. असे असले तरी प्रत्येकावर तसेच परिणाम दिसतील असे नाही. लोकांमध्ये नैराश्याची वाढ होण्यास अनेक कारणे अशू शकतात पण जनुकांचे आविष्करण त्यात महत्वाची भूमिका पार पाडते. नैराश्यास अनुकूल स्थिती असली तरी काही लोकांमध्ये ते दिसून येत नाही पण जेव्हा हवा प्रदूषणामुळे या जनुकांचे आविष्करण आणखी बिघडले तर त्या व्यक्ती नैराश्याने ग्रस्त होतात. हवा प्रदूषण व मेंदूतील चेता पेशींच्या जोडण्या याला जास्त महत्व आहे. त्यांच्यात परस्पर संबंध जोडता येतो असे या संशोधनातील आणखी एक वैज्ञानिक झी लाय यांनी म्हटले आहे. हवा प्रदूषणामुळे नैराश्याचे प्रमाण जास्त वाढत जाते व जनुकांचे आविष्करण विपरित होऊ लागते. या अभ्यासात ३५२ जणांचा समावेश होता ते बीजिंगमध्ये राहणारे होते त्या शहरात सर्वात जास्त प्रदूषण आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Genes and air pollution elevate depression risk zws

ताज्या बातम्या