उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी लोणी बॉर्डरवर अब्दुल समद या वयस्कर व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या आणि जबरदस्तीने दाढी कापण्यात आल्याच्या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ९ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये काँग्रेसचे नेते, पत्रकार, ट्विटरच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. लोणी बॉर्डर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षकाने हा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता १५३ (दंगल घडवण्यासाठी चिथावणी देणे), १५३ अ (दोन गटांमध्ये द्वेष पसरवणे), २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे), ५०५ (फसवणूक), १२० ब (गुन्हेगारी भावनेने कृत्य करणे) आणि ३४ (विशिष्ट हेतूने गुन्हा करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणामध्ये पत्रकार मोहम्मद झुबैर, राणा आयुब यांनी या प्रकरणासंदर्भात ट्विट केल्याने त्यांच्या नावाचाही एफआयआरमध्ये समावेश केलाय. याशिवाय काँग्रेस नेते सलमान नाझमी, शमा मोहम्मद आणि मसकुर उस्मानी, लेखिका साबा नक्वी, द वायर ही कंपनी, ट्विटर आयएनसी आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केलाय. गाझियाबादमध्ये वयस्कर व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणामध्ये देण्यात आलेली सर्व माहिती चुकीची असल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

नक्की वाचा >> योगींच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमधील बेरोजगारांच्या संख्येत अडीच पटींने वाढ; राज्याच्या GDP मध्ये घट

काय घडलं?

व्हायरल व्हिडीओमधील वयस्कर व्यक्तीने अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र ही वयस्कर व्यक्ती त्या लोकांना ओळखथ होती. तसेच तिथे जबरदस्तीने जय श्री रामच्या घोषणा देण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार पीडित अब्दुल समद ५ जून रोजी बुलंदशहरमधून बेहटा (लोणी बॉर्डर) येथे आले होते. इथून अब्दुल समद एका अन्य व्यक्तीसोबत मुख्य आरोपी असणाऱ्या परवेश गुज्जरच्या बंथला (लोणी) येथील घरी गेले होते. त्यानंतर परवेशच्या घरी काही वेळात इतर मुलं आली. यामध्ये कल्लू, पोली, आरिफ, आदिल आणि मुशाहिद या मुलांचा समावेश होते. परवेशसोबत मिळून त्यांनी अब्दुल समद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल समद हा तावीज बनावायचं काम करायचा. अब्दुल समदने बनवलेल्या एका तावीजचा कुटुंबावर उलट परिणाम झाल्याच्या रागातून त्यांना जाब विचारत मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

अब्दुल समद आणि परवेश, आदिल, कल्लू हे लोक एकमेकांना आधीपासून ओळखत होते. अब्दुल समदने गावातील अनेक लोकांना तावीज दिले होते. या प्रकरणामध्ये परवेश गुज्जरला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर १४ जून रोजी अन्य दोघांना यामध्ये कल्लू आणि आदिल यांना अटक करण्यात आलीय. इतर गुन्हेगारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

नक्की वाचा >> पंतप्रधान मोदी आणि योगींमध्ये मतभेद?; #ModiVsYogi मुळे चर्चांना उधाण

राजकारण तापलं…

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही तो ट्विट केला होता. यावर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला बदनाम करु नये असा सल्ला राहुल यांना दिला होता. लोणी बॉर्डर परिसरात रिक्षामध्ये बसलेल्या वृद्ध व्यक्तीला जय श्री राम न बोलल्यामुळे मारहाण केल्याचा दावा करण्यात आला. ही घटना ५ जून रोजी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवरुन बुधवारी टीका केली ज्यावर उत्तर देत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे.राहुल गांधी यांनी ट्विट करत ही घटना राहुल यांनी लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. “मी हे मानायला तयार नाही की श्रीरामे खरे भक्त असे काही करु शकतात. अशी क्रूरता मानवतेपासून खूप दूर आहे आणि समाज आणि धर्म दोघांसाठी लज्जास्पद आहे,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधींच्या ट्वीटची खिल्ली उडवत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तुम्ही आयुष्यात कधीही खरं बोलला नाहीत असे म्हटले आहे. “भगवान श्री रामांचा पहिला धडा म्हणजे “सत्य बोला” जे तुम्ही आयुष्यात कधीच केले नाही. पोलिसांनी खरी माहिती दिल्यानंतरही तुम्ही समाजात विष कालवण्यात गुंतलेले आहात याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेच्या लोभात माणुसकीचा अपमान होत आहे. उत्तर प्रदेशातील लोकांचा अपमान करणे आणि त्यांची बदनामी करणे थांबवा”, असे योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghaziabad police lodge fir against twitter journalists congress leaders for tweets on elderly man assault scsg
First published on: 16-06-2021 at 07:47 IST