Video Of PM Modi-Meloni Meet At G7: कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या ५१व्या जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली होती. ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी भारत आणि इटलीमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
बैठकीनंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “इटली आणि भारत एका उत्तम मैत्रीने जोडलेले आहेत.” यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. भारत आणि इटलीमधील मैत्री आणखी मजबूत होत राहील, ज्याचा आपल्या नागरिकांना फायदा होईल.”
दरम्यान, दोन्ही नेत्यांमधील जी-७ शिखर परिषदेतील संभाषणाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शेअर होत असलेल्या व्हिडिओमध्ये, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना आणि हसत हसत, “तुम्ही सर्वोत्तम आहात. मी तुमच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करत आहे”, असे म्हणत असल्याचे ऐकू येत आहे. यावर पंतप्रधान मोदी हसत प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.
मेलोनी आणि मोदी यांच्या या भेटीमुळे #Melodi हा हॅशटॅग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वीही जी-२० शिखर परिषदेत आणि COP28 मधील दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडामध्ये पार पडलेल्या जी-७ शिखर परिषदेत सलग सहाव्यांदा सहभाग नोंदवला होता. जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी यांनी अनेक देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. यामध्ये दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रप्रमुख समाविष्ट होते.
दरम्यान पंतप्रधान मोदींचा कॅनडा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा गेल्या काही महिन्यांत भारत आणि कॅनडामधील संबंध तणावपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत त्यांची उपस्थिती राजनैतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते.
भारत आणि इटलीमधील संबंधांबद्दल बोलायचे झाले तर, अलिकडच्या काळात दोन्ही देशांमध्ये संरक्षण, गुंतवणूक, हरित ऊर्जा आणि तांत्रिक सहकार्याच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्या या ताज्या भेटीकडे या भागीदारीला आणखी चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.