मी वाईट असेन पण तेही चांगले नाहीत. हा काही महासत्तेच्या प्रमुखपदी बसण्याचं स्वप्न पाहणाऱ्याचा युक्तिवाद असू शकत नाही. पण आज झालेल्या अध्यक्षीय चर्चेच्या दुसऱ्या वादफेरीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या संदर्भात नेमका हा बचावाचा सूर होता. त्यामुळे या दुसऱ्या वादफेरीनंतरही चांगला उमेदवार कोण, या प्रश्नाच्या उत्तरात अमेरिकनांना कमी वाईट कोण तेवढंच काय ते उमगलं.
आजच्या दुसऱ्या वादफेरीबाबत ट्रम्प समर्थकांच्या फारच अपेक्षा होत्या. दोन कारणं त्यामागे. एक म्हणजे पहिली वादफेरी ट्रम्प यांच्यासाठी काही फारशी चांगली नव्हती. हिलरी क्लिंटन यांनी त्यांना दुखतं तिथं खुपतं चांगलंच जेरीला आणलं होतं. तेव्हा आज ट्रम्प अधिक चेवून प्रतिहल्ला करणार हे उघड होतं. आणि दुसरं कारण म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या मधल्या टप्प्यात ट्रम्प यांची बरीच कुलंगडी बाहेर आलेली. तेव्हा त्यावरही खुलासा करण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी ट्रम्प आसुसलेले असणार. त्यामुळेही ही वादफेरी ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाची होती.
ती तशीच झाली. फक्त प्रश्न असा की अध्यक्षीय खुर्चीत बसू पाहणाऱ्याने आणि पाहणारीने किती आदब सोडावी आणि आब विसरावा. या चर्चेची सुरुवातच मुळी ट्रम्प यांनी हिलरी यांच्या पतीने, म्हणजे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी, केलेल्या कथित लैंगिक अत्याचारांनी केली. प्रसंग पडल्यास हाताशी असाव्यात म्हणून या वादफेरीसाठी ट्रम्प यांनी क्लिंटन यांच्यावर असे आरोप करणाऱ्या महिलांनाही चर्चेत पहिल्याच रांगेवर आणून बसवलं होतं. हेतू हा की हिलरी यांचं मनोधैर्य खच्ची व्हावं. हा मार्ग अगदीच घृणास्पद. तरीही ट्रम्प यांनी तो चोखाळला.
दुसरा मुद्दा क्लिंटन यांच्या कथित लैंगिक अत्याचारांचा. वादासाठी ते आरोप खरे आहेत असं समजा मान्य जरी केलं तरी त्याचा अध्यक्षीय निवडणुकीशी संबंध काय? अध्यक्षीय निवडणुकीत क्लिंटन नाहीत, हिलरी आहेत. त्यांच्या नवऱ्यानं नको ते केलं जरी असलं तरी त्यासाठी हिलरी यांना बोल लावण्यात काय पुरुषार्थ? पण इतकं तारतम्य दाखवलं तर ते ट्रम्प कसले?
या चर्चेसाठी ट्रम्प यांचं एकच धोरण होतं. ते म्हणजे प्रतिहल्ला चढवणं. आपल्यासमोर असलेल्या मुद्दय़ावर काही प्रतिपादन करण्याऐवजी प्रतिहल्ला चढवणं हे अनेकार्थानं स्वार्थसाधक असतं. परत त्यामुळे मूळ मुद्दय़ाला बगल देता येते आणि हल्ल्याच्या रेटय़ानं समोरचा गांगरून जाऊ शकतो. ट्रम्प यांचे सगळे विचार आणि नंतरची कृती ही या अनुषंगानं सुरू होती. तुम्ही तुमच्या आयकराचा तपशील जाहीर कधी करणार या हिलरी यांच्या प्रश्नाला ट्रम्प यांचं उत्तर काय? तर तुम्ही तुमचे वगळलेले ईमेल कधी जाहीर करणार? चारित्र्याच्या मुद्दय़ाबाबतही तेच. तुम्ही खूप वाह्य़ात शब्दांत स्त्रियांविषयी बोललात असं ट्रम्प यांना सूत्रसंचालकानं दाखवून दिल्यावर त्यांचा बचाव काय? तर मी फक्त बोललो, क्लिंटन यांनी कृती केली.. तुम्ही करचुकवेगिरी केलीत? हो केली ना.. पण हिलरी यांच्या निकटवर्तीयांनी माझ्यापेक्षाही अधिक कर चुकवलेत.. हे उत्तर.
म्हणजे सगळा भर मी वाईट असेन, पण माझा प्रतिस्पर्धी माझ्याहीपेक्षा वाईट आहे, हे दाखवून देण्यावर. यावर काहींना भारतीय वातावरणाची आठवण झाली तर आश्चर्य नाही. म्हणजे सरकारला तुम्ही भ्रष्टाचार करताय किंवा अयोग्य निर्णय घेताय असं म्हटलं तर ते नाकारण्याऐवजी सरकारवाले काय म्हणतात? तर काँग्रेस गेली ६० र्वष दुसरं काय करतीये? त्यांना नाही विचारलंत? आता आम्हाला कसा काय जाब विचारता..! या विधानाचाही सूर हाच. आम्ही वाईट असू, पण आमचे विरोधक आमच्यापेक्षा अधिक वाईट आहेत. असा.
आजच्या चर्चेत ट्रम्प यांच्या आणखी दोन विधानांनी एकदम भारताची आठवण झाली. यातल्या पहिल्या विधानात ते म्हणाले, हिलरी क्लिंटन यांना मी तुरुंगातच पाठवीन. इतकं म्हणूनच ते थांबले नाहीत. पुढे त्यांना किमान दोन वेळा या तुरुंगात पाठवण्याच्या शपथेचा पुनरुच्चार केला. हे अभूतपूर्व म्हणायला हवं. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत एका उमेदवारानं दुसऱ्याला तुरुंगात पाठवू असं म्हणणं म्हणजे या निवडणुकीला थेट तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पातळीवर आणणं. पण तसं झालं खरं.
दुसरा मुद्दा अमेरिकेच्या सीरियाबाबतच्या धोरणाचा. सध्या खरं तर अमेरिकेला सीरियाबाबत काही धोरण आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. दोनेक वर्षांपूर्वी अध्यक्ष ओबामा यांनी सीरियाचे असाद यांना इशारा दिला होता.. लक्ष्मणरेषा ओलांडू नका, म्हणून. पण त्यानंतर असाद ती रेषा ओलांडलेल्या अवस्थेत बराच काळ राहिले. काही झालं नाही. हा प्रश्न परवा उपाध्यक्षांच्या वादफेरीतही आला. त्या वेळी ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार माईक पेन्स यांनी अमेरिकेने सीरियात हवाई मारा करायची तयारी करायला हवी, अशा अर्थाचं विधान केलं. आज ट्रम्प यांना हाच प्रश्न केला असता त्यांनी आपल्या उपाध्यक्षालाच अव्हेरलं. माझं आणि पेन्स यांचं काही बोलणं झालेलं नाही या विषयावर. पण हा पर्याय मी फेटाळून लावतो, असं म्हणाले ट्रम्प. हे भयंकर अशा अर्थानं की स्वत:च्या मंत्र्याचीच भूमिका मुख्यमंत्री वा पंतप्रधानांनी नाकारल्यासारखं. अशा वेळी या मुख्य नेत्यांना एकच पर्याय असतो. तो म्हणजे आपल्या कनिष्ठाला बदलायचं.
पण ट्रम्प यांनी जो काही धक्का दिलाय त्यामुळे त्यांचा कनिष्ठच ट्रम्प यांना सोडून जाता येईल का, हे पाहतोय. सोमवारच्या अंकात पेन्स आणि ट्रम्प यांचे संबंध कसे ताणलेले आहेत, याचा तपशील आलाय. ट्रम्प यांच्या आजच्या धक्क्याने ते अधिकच दुरावलेत. ट्रम्प यांचं आजचं वागणं म्हणजे सर्वार्थाने उपाध्यक्षाचा अपमान. त्याचमुळे पेन्स हे आता रिंगणातून बाहेर जाण्याचा विचार करतायत असं वृत्त आहे. न्यू जर्सी इथं त्यांनी ट्रम्प समर्थनार्थ आयोजित केलेली सभा रद्द केलीये, हे या वृत्तामागील एक कारण.
हा असा प्रकार कधी अमेरिकेच्या राजकीय इतिहासात घडला नव्हता. त्या अर्थाने ट्रम्प हे इतिहास घडवतायत, असं म्हणायला हवं. पेन्स खरोखरच रिंगणातून बाहेर आले तर भलतीच परिस्थिती तयार व्हायची.
जुन्या युद्ध डावपेचात दग्धभू या नावानं ओळखलं जाणारं एक धोरण असे. आपण हरणार असं जेव्हा एखाद्या सैन्याला वाटतं तेव्हा ते सैनिक माघार घेताना जाळपोळ करत मागे निघतात. पिकं, वनसंपत्ती, माणसं, घरदार वगैरे मिळेल त्याला ते आग लावतात. ट्रम्प यांचं हे असं झालंय. ते मिळेल त्याला आग लावत सुटलेत. ही अध्यक्षीय दग्धभू लाजिरवाणी आहे हे नक्की.
– गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
twitter @girishkuber