डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर २५ टक्के तर भारत, ब्राझिल अशा देशांवर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे उचलेलं पाऊल ही त्यांची मनमानी आहे अशी टीका अनेक तज्ज्ञ करत आहेत. जगभरातल्या अर्थतज्ज्ञांनी या ही मनमानी असल्याचं म्हटलं आहे. यात आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माजी अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांचीही भर पडली आहे. गीता गोपीनाथ यांनी अमेरिकेतील टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. गीता गोपीनाथ या अमेरिकेच्या अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केली आहे.
काय म्हणाल्या आहेत गीता गोपीनाथ?
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादून सहा महिने झाले आहेत तरीही त्याचा फारसा परिणाम पाहण्यास मिळालेला नाही. अमेरिकेच्या महसुलात फारशी वाढ झालेली नाही. तसंच जी वाढ झाली आहे तो महसूल अमेरिकेच्या जनतेकडून किंवा इथल्या कंपन्यांकडून वसुल करण्यात आला आहे.
टॅरिफ लादल्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम-गीता गोपीनाथ
टॅरिफ लादल्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जी टॅरिफची घोषणा केली त्यानंतर व्यापार जगतात ट्रेड वॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनशी व्यापारविषयक संघर्ष, ब्राझिल किंवा भारतासारख्या देशांशी व्यापारविषयक संघर्ष या गोष्टी सुरु झाल्या आहेत. भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लादण्यात आला. त्यानंतर रशियाकडून कच्चं तेल खरेदीचा मुद्दा उपस्थित करत भारतावरचं आयात शुल्क वाढवण्यात आलं. आता या सगळ्याचा अमेरिकेला काय फायदा झाला? असा प्रश्न उपस्थित करत गीता गोपीनाथ यांनी एक पोस्ट लिहून या सगळ्याचा अमेरिकेवर नकारात्मक परिणाम झाल्याचं म्हटलं आहे.
गीता गोपीनाथ यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
गीता गोपीनाथ म्हणतात, “डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करण्याची घोषणा करुन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र या निर्णयाचा काहीही खास परिणाम झालेला नाही. अमेरिकेने टॅरिफ लादून काय मिळवलं? अमेरिकेचा महसूल वाढला का? अमेरिकेचा आत्ताच्या घडीला जो महसूल वाढला आहे त्यात अमेरिकन कंपन्या आणि नागरिकांचाच वाटा मोठा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बाबत घेतलेल्या निर्णय हा काही फार फायदेशीर ठरला नाही.” या आशयाची पोस्ट गीता गोपीनाथ यांनी केली आहे. गीता गोपीनाथ म्हणतात, अमेरिकेने टॅरिफचा निर्णय जाहीर केल्यानंतर इथला महागाई दर वाढला आहे. फर्निचर, कॉफी, घरगुती वापराच्या वस्तू महाग झाल्या आहेत.