मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ज्या कॉर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापे टाकले होते ती क्रूझ पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसहीत त्याच्या मित्र्यांना ज्या क्रूझवरुन अटक करण्यात आली ती क्रूझ पुन्हा चर्चेत येण्यामागील कारण आहे करोना. देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच या क्रूझवरील ६६ प्रवाशांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी ही माहिती दिलीय.

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गेलेले गोव्याला
मुंबईहून गोव्याला आलेल्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील सुमारे दोन हजार प्रवाशांपैकी ६६ जणांना करोना संसर्ग झाला असल्याचं राणे यांनी स्पष्ट केलं आहे. हे सर्व प्रवासी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जहाजावरच थांबण्याचे आदेश
गोवा सरकारच्या आरोग्य विभागाच्या पथकाने जहाजावरील प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा जहाज गोव्यामधील बंदराला लागलं तेव्हाच करोना चाचण्या केल्या होत्या. रविवारी चाचण्यांचे अहवाल समोर आल्यानंतर ६६ लोकांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले. सोमवारीही अन्य प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांनी जहाजावरच थांबणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

लवकरच नाईट कर्फ्यू…
करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोव्यात शाळा आणि महाविद्यालये २६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रात्रीच्या जमावबंदीचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

त्यांना शाळेत येण्याची गरज नाही…
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी करोना कृती दलाची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोवा सरकारने काही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात रविवारी करोना रुग्णवाढीचा दर १०.७ टक्के होता. करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी कृती दलाची बैठक घेतली. ‘‘करोना रुग्णवाढीमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांची शारीरिक सत्रे बंद राहतील. लस घेण्यासाठी ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागेल. लसीकरण झाल्यानंतर त्यांना शाळेत येण्याची गरज नाही,’’ असे कृती दलाचे सदस्य शेखर साल्कर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात चार ओमायक्रॉनबाधित
गोव्याच्या आरोग्यमंत्री राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी चार ओमायक्रॉनबाधित असल्याचे आढळले आहे. त्यापैकी एक रुग्ण गोव्याचा असून त्याने परदेश प्रवास केलेला नाही.