scorecardresearch

“माझ्यासाठी कालीमाता मांसाहार, मद्याचा स्वीकार करणारी”, तृणमूल खासदार महुआ मोईत्रांचं विधान; ‘त्या’ पोस्टरवरून वाद!

महुआ मोईत्रा म्हणतात, “तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी…!”

Goddess Kaali smoking a cigarette
'काली' माहितीपटाच्या पोस्टरवरून सध्या वाद सुरू झाला आहे. (पोस्टर फोटो लीना मणीमेकलाई यांच्या ट्विटरवरून साभार)

गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या पोस्टरवरून तुफान वाद सुरू झाला आहे. हिंदुंच्या भावना दुखावणारं हे पोस्टर असल्याची टीका केली जात असून त्यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आजपर्यंत अनेक चित्रपटांवर अशाच प्रकारे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, नंतर वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता लीना मणीमेकलई यांच्या ‘काली’ या माहितीपटावरून असाच वाद सुरू झाला आहे. त्यांच्या माहितीपटाच्या पोस्टरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला आहे. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे यासंदर्भात बोलताना तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केलेलं विधान वादात सापडलं आहे. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना मोईत्रा यांनी हे विधान केलं आहे.

काय आहे वाद?

लीना मणिमेकलई यांनी काली हा माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटाचं पोस्टर नुकतंच ‘ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा’ नावाच्या कार्यक्रमात लाँच करण्यात आलं होतं. मात्र, तेव्हापासून ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागलं आहे. या पोस्टरमध्ये कालीमातेच्या तोंडात सिगारेट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मूळ दृश्यामधे कालीमातेच्या पेहेरावात असणारी महिला सिगारेट ओढत असल्याचं देखील दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात महुआ मोईत्रा यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

पाहा व्हिडीओ –

कालीमातेच्या तोंडात सिगारेट; माहितीपटाचं पोस्टर बघून नेटीझन्स भडकले, कारवाई करण्याची थेट गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी

नेमकं काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?

यासंदर्भात बोलताना महुआ मोईत्रा यांनी प्रत्येकाला आपल्या इश्वराविषयी कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं म्हटलं आहे. “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असं महुआ मोईत्रा म्हणाल्या आहेत.

२ जुलै रोजी लीना मणीमेकलई यांनी या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. मात्र, त्यावर नेटिझन्सनी तीव्र आक्षेप घेत लीना यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या पोस्टवर आत्तापर्यंत हजारो प्रतिक्रिया आल्या असून त्यातील बहुतांश प्रतिक्रियांमध्ये त्यांच्यावर टीका करण्यात आल्याचं दिसून येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goddess kaali smoking a cigarette poster controversy mahua moitra statement pmw

ताज्या बातम्या