गुगल ही इंटरनेट सर्च कंपनी आता ग्राहकांना अधिक सेवा देण्यासाठी ‘स्कायबॉक्स’ ही उपग्रहनिर्मिती करणारी कंपनी ५० कोटी अमेरिकी डॉलरला खरेदी करणार आहे, त्याबाबतचा करार नुकताच झाला आहे. या करारामुळे गुगल सर्च इंजिन आणखी दमदार होणार असून गुगलचा स्वत:चा उपग्रह पाठवून हवाई छायाचित्रे घेतली जातील. जगातील दूरस्थ प्रदेशांमध्येही गुगलचा ऑनलाईन अॅक्सेस पोहोचू शकेल. स्कायबॉक्स उपग्रह हे गुगल मॅप म्हणजे गुगल सेवेतील नकाशे आणखी अचूक बनणार आहेत. स्कायबॉक्स उपग्रह पथक व तंत्रज्ञान यांच्या मदतीने आपत्तीच्या ठिकाणी मदत करणे सोपे जाणार आहे. स्कायबॉक्सने म्हटले आहे की, अजून आमचा व्यवहार पूर्ण झालेला नाही. पाच वर्षांपूर्वी स्कायबॉक्सने आपला प्रवास सुरू केला, माहितीच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणले. आम्ही जगातील सर्वात लहान उच्च विवर्तन उपग्रह बनवला, त्यामुळे रोज चांगली छायाचित्रे व व्हिडिओ मिळतात. आम्हाला आणखी जास्त चांगल्या कल्पनाशक्तीने काम करायला लावणाऱ्या कंपनीशी हा व्यवहार होत आहे. स्कायबॉक्स व गुगल यांनी निवेदनात म्हटले आहे की, माहिती सहजसाध्य व उपयुक्त पद्धतीने मिळाली पाहिजे हा यामागचा हेतू आहे. दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने आता अनेक मोठी आव्हाने पेलता येतील.