हरवलेल्या व्यक्तिंना शोधण्यासाठी गुगलच्या पर्सन फाइंडर टूलचा वापर केरळमध्ये पूरात ताटातूट झालेल्यांचा शोध घेण्यासाठी करण्यात येत आहे. केरळमधल्या पावसाच्या हाहाकारात तब्बल 164 जणांनी प्राण गमावले आहेत. लाखो जण विस्थापित झाले आहेत आणि अजूनही 14 पैकी तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी आहे. ज्या भागात शेकडो लोकांची ताटातूट झाली आहे अशा पूरग्रस्त भागामध्ये गुगलच्या पर्सन फाइंडर टूलचा वापर शक्य आहे.
हे टूल डेस्कटॉप किंवा मोबाइलवरून लॉग ऑन करून वापरता येतं. हपवलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी अथवा हरवलेल्या व्यक्तिची माहिती देण्यासाठी हे टूल वापरता येतं. हे टूल सगळ्या लोकांसाठी उपलब्ध आहे. हरवलेल्या व्यक्तिचं नाव इथं द्यायचं असतं. यूजर नवीन रेकॉर्डही तयार करू शकतो. या व्यक्तिची उपलब्ध असलेली माहिती व असेल तर पत्ता गुगल लगेच देतं. हरवलेल्या व्यक्तिची तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावंही इथं देण्याची सोय आहे.
Our thoughts are with those in Kerala. Help track missing people with #personfinder: https://t.co/8EECLFpCqv #KeralaFloods pic.twitter.com/mo9VM3Uph4
— Google India (@GoogleIndia) August 16, 2018
गुगल इंडियानं ट्विट करून ही माहिती दिली असून हरवलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्याचा प्रयत्न करू असं गुगलनं म्हटलं आहे. गुगलनं त्यासाठी #personfinder: https://goo.gl/WxuUFp #KeralaFloods हा हॅशटॅग व लिंक दिली आहे. हैतीमधल्या भूकंपाच्यावेळी गुगलनं ही सेवा दाखल केली होती. तसेच उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलंयकारी पूराच्यावेळीही ही सुविधा गुगलनं भारतात दाखल केली होती. आता पुन्हा केरळमध्ये या सेवेचा लाभ गुगल देत आहे.
याशिवाय फेसबुकनेदेखील केरळ फ्लड लाइव्ह हे पेज सुरू केले असून आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतामध्ये फेसबुकचे 27 कोटी युजर्स आहेत. फेसबुकने सेफ्टी चेक फीचरही दाखल केलं असून मित्र व नातेवाईक सुखरूप आहेत की नाही हे यावरून कळण्याची सोय असल्याचे सांगण्यात आले आहे.