महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या खांद्यावर विसंबून राहून वाटचाल केली, त्या प्रमोद महाजन यांच्यासारखा मित्र व नातलगाचा आधार अचानक गमावला, वडील बंधू अन् मुलासमान असलेला पुतण्या धनंजय दुरावला.. अनेक अपघात झाले व प्रकृतीच्याही तक्रारी सुरू झाल्या..अतिशय संवेदनाशील व हळवे असलेले मुंडे क्षणभर हेलावलेही. पण जबर िहमत आणि राजकीय कसब असलेला हा नेता या अवघड प्रसंगांमधूनही बाहेर पडला. जणू आयुष्यभर साथीला असलेल्या संघर्षांच्या काळातही त्यांची मुलुखमैदान तोफ सतत धडधडतच राहिली. अडीअडचणी व कटू प्रसंगांवर मात करून मुंडेंचा संघर्ष सुरू  त्यांच्या राजकीय जीवनात अनेक स्थित्यंतरे झाली. पक्षातील काही नेत्यांशी असलेल्या मतभेदांमुळे मुंडे यांना अगदी पक्ष सोडावा लागणार की काय, अशी वेळ आली होती. पण मुंडे शांतपणे व निर्धाराने सर्वाना तोंड देत होते. केंद्रातील सत्ता गमावल्यानंतर आणि महाजन यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात भाजपची पीछेहाट झाली होती. पक्षाला नवचैतन्य देणे आवश्यक होते. त्यासाठी मुंडे यांनी प्रयत्न सुरू केले व राज्यात संघटनेची बांधणी केली. मुंडे यांनी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली आणि ते लोकसभेत पक्षाचे उपनेते झाले.  लोकसभा निवडणुकीची तयारी दीड-दोन वर्षांपूर्वी सुरू झाली, तेव्हा महाराष्ट्रात पक्षाच्या नेतृत्वाची धुरा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली. काही काळ पक्षात एकाकीपणे काढलेल्या मुंडे यांच्यावर ही जबाबदारी आल्यावर नव्या जोमाने ते कामाला लागले. सत्तापरिवर्तनासाठी मनसेला युतीसोबत घ्यावे लागेल, अशी कल्पना त्यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडली. त्यामुळे मतभेदही झाले. पण शिवसेनेच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी महायुती साकारली. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना सोबत घेतले जाईल की काय, अशी चर्चा सुरू झाली. गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात पवारांशी कायम संघर्ष केलेल्या मुंडे यांनी त्यास ठामपणे विरोध केला व आपल्या भूमिकेशी ते कायम चिकटून राहिले.
त्यांच्यावर प्रकृतीच्या कुरबुरी, अपघात किंवा कौटुंबिक कलह यातून कायमच आघात होत राहिले. हळवे व संवेदनाशील असलेल्या मुंडे यांच्या डोळ्यात अशा प्रसंगामध्ये अश्रूही आले. पण तरीही न डगमगता ते वाटचाल करीत राहिले. मधुमेह, रक्तदाब आजार असताना खाण्यापिण्याचे व त्याच्या वेळा पाळण्याचे पथ्य त्यांनी कधीच पाळले नाही. त्यांनी कायमच प्रकृतीची हेळसांड केली. काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर त्यांना पाठीचे व मानेचे दुखणे मागे लागले. आपल्यावरील अपघात झेलत असताना दीड-दोन
वर्षांपूर्वी त्यांच्या मुलींनाही अपघात झाला, पण सुदैवाने त्यांना काही झाले नाही.