सामाजिक धृवीकरणाची धुरा वाहात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा राजकीय पाया रुंदावणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी पहाटे नवी दिल्लीत रस्ता अपघातात निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंडे यांच्या अनपेक्षित निधनाने देशभरातून शोकमग्न प्रतिक्रिया उमटल्या असून महाराष्ट्रातील राजकीय आसमंतही हादरला आहे. या अपघाताचा घातपाताच्या अंगाने तपास सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी पातियाळा न्यायालयात दिली.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी गेल्याच आठवडय़ात पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांबाबत तसेच ग्रामीण प्रश्नांबाबत उत्तम जाण असल्याने मुंडे या प्रश्नांची तड लावतील, या ग्रामीण जनतेच्या अपेक्षांनाही या निधनाने मूठमाती मिळाली आहे.
ज्या इंडिका कारने मुंडे यांच्या वाहनाला धडक दिली ती चालविणारा गुरविंदर सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. सिग्नल तोडून त्याने गाडी पुढे वेगाने दामटली आणि मुंडे बसले होते त्या दरवाजावरच तिची धडक बसली होती. त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली मात्र न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर व वैयक्तिक जामीनावर त्याची सुटका केली.
मुंडे यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने तसेच शरीरांतर्गत जखमांमुळे झाला. त्यांच्या शरीरावर बाह्य़ जखमा आढळल्या नाहीत. मात्र त्यांचे यकृत २-३ ठिकाणी फाटलेले होते आणि या जखमांमुळे सुमारे दीड लिटर रक्त शरीरात पसरले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन तसेच ‘एम्स’चे प्रवक्ते डॉ. अमित गुप्ता यांनी दिली. मुंडे यांच्या गाडीवर इंडिका कार आदळल्याने मुंडे यांना जोराचा धक्का बसला आणि त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका बसला, असे सूत्रांनी सांगितले. मुंडे यांना एम्स रुग्णालयाच्या ‘ट्रॉमा’ केंद्रात आणण्यात आले. त्या वेळी त्यांची नाडी लागत नव्हती, तसेच हृदयाची धडधडही सुरू नव्हती, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
मुंडे यांच्या मागे पत्नी प्रज्ञा आणि तीन मुली असून परळी मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेल्या पंकजा मुंडे या त्यांच्या राजकीय वारसदार मानल्या जातात.
विधिमंडळावर शोककळा
केंद्रीय ग्रामविकासमंत्री आणि महाराष्ट्राची मुलुखमैदानी तोफ गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त येताच विधिमंडळ परिसरावर शोककळा पसरली. महाराष्ट्राच्या या लाडक्या लोकनेत्यास दोन्ही सभागृहांत आदरांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मुंडेंच्या निधनाचे वृत्त कानी पडताच भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी दिल्लीकडे तर सदस्यांनी पक्षाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यातच निधनाचे अधिकृत वृत्त केंद्र सरकारकडून येण्यास विलंब झाल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर विधानसभेत मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंडे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडताना महाराष्ट्रातील खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ख्याती असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिक निधन अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र एका अष्टावधानी नेतृत्वाला आणि एक संवेदनशील लोकसेवकाला मुकल्याचे सांगितले. जिल्हा परिषद गटातील कार्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास सातत्यपूर्ण लोकसेवा आणि लोकसंग्रहाच्या बळावर केंद्रीय मंत्रिपदापर्यंत विस्तारला गेला, असेही ते म्हणाल़े
तीनचा फेरा..
प्रमोद महाजन हे मुंडे यांचे मेहुणे. भाजपला महाराष्ट्रात सर्वसमावेशक चेहरा मिळवून देण्यात या दोघांचा मोठा वाटा होता. महाजन यांच्यावर त्यांचा भाऊ प्रवीण यानेच गोळीबार केला आणि हिंदुजा रुग्णालयात महाजन यांचे ३ मे २००६ रोजी निधन झाले. महाजन यांचे अत्यंत विश्वासू सहाय्यक विवेक मोइत्रा यांचे त्यानंतर अवघ्या महिनाभरात, ३ जून २००६ रोजी निधन झाले. महाजन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रवीण महाजनचा ३ मार्च २०१०ला मृत्यू झाला. महाजन-मुंडे कुटुंबियांना ३ तारीख अशी छळत असतानाच मुंडे यांचे अपघाती निधन झाले तो दिवसही ३ जूनचाच ठरला.
सोनिया, राहुल यांची मुंडेंना श्रद्धांजली
नवी दिल्ली: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दु:ख व्यक्त करत मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा यांना शोकसंदेश पाठवला आहे. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन मुंडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. जीवनात काही प्रसंग असे येतात, की त्यावर कुणाचेही नियंत्रण राहात नाही, असे सोनियांनी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले. राजकीय आणि सामजिक जीवनात ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या मुंडे यांनी निष्ठेने पार पाडल्या, अशा शब्दांत सोनियांनी आदरांजली वाहिली. कष्टाने मुंडे यांनी समाजातील वंचित घटकांसाठी जे काम केले ते प्रेरणादायी असल्याचे सोनियांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन मुंडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यांच्या समवेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत हे होते.
श्रद्धांजली
गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन हे अतिशय धक्कादायक आणि चटका लावून जाणारे आहे. अथक संघर्ष करून त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजकारणाच्याही पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपकी ते एक होते. अतिशय विनम्र स्वभाव हा त्यांचा गुण सर्वानीच घेण्यासारखा आहे. त्यांच्या निधनाने केवळ मराठवाडय़ाचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नुकसान झाले आहे. आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार या पदांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताची अनेक कामे केली. केंद्रीय मंत्रिपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांत मृत्यूने त्यांना अशा भयानक आणि निर्दयी प्रकारे गाठावे, हे अतिशय क्लेशकारक आहे.
– पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
मुंडेसाहेबांच्या अपघाती निधनामुळे राज्याचा एक लोकनेता हरपला आहे. विकासाचा दृष्टिकोन असलेले लोकनेते म्हणून मुंडेसाहेब केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परिचित होते. त्यांना प्रचंड जनाधार होता. ग्रामीण जनतेसह समाजाच्या विविध प्रश्नांची त्यांना बारकाईने जाण होती. त्यामुळेच त्यांच्यावर आता केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. एक मोठी संधी मिळालेली असताना असा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याने तीव्र वेदना होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा बुलंद आवाज लुप्त झाला आहे. राज्याच्या हितासाठी नेहमीच त्यांनी सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना जनमानसांत प्रचंड लोकप्रियता लाभली होती. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन जनसेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समíपत केले होते.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाळ असलेला, निधडय़ा छातीचा नेता म्हणूनच गोपीनाथ मुंडे देशाला परिचित होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक झुंजार नेता आपण गमावला आहे. मुंडे यांच्या निधनाच्या बातमीने मला जबर धक्का बसला. त्यांचे अचानक जाणे ही घटना मनाला चटका लावणारी आहे. प्रचंड संघर्ष करणारे आणि दांडगा लोकसंपर्क असलेले हे एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. गोपीनाथ मुंडे राजकीय विरोधक जरी असले तरी वैयक्तिक ते माझे मित्र होते. ते विरोधक होते पण शत्रू नव्हते. त्यांच्या निधनाने एक लोकनेता काळाने आज आपल्यातून हिरावून नेला आहे.
– आर. आर. पाटील, गृहमंत्री
मुंडेंचे एकाएकी जाणे ही अत्यंत दु:खद घटना आह़े विद्यार्थी दशेपासूनच स्वयंसेवक असणाऱ्या मुंडे यांनी त्यांच्या कर्तृत्वाने भाजपला महाराष्ट्रात घरोघरी पोहोचविल़े आता त्यांच्यावर अखिल भारतीय जबाबदारी आल्यामुळे ते त्यांच्या कुशल नेतृत्त्वाने नवा इतिहास घडवतील अशी आपली अपेक्षा होती़ परंतु, त्याच वेळी नियतीची योजना किती निष्ठुर असते याचा आपल्याला प्रत्यय आला आह़े ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांस हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो़
– मोहन भागवत, सरसंघचालक
गोपीनाथ मुंडे यांनी फारच गरिबीतून वर येऊन राष्ट्रीय नेते म्हणून उदयाला येताना, त्यांचा भक्कम सामाजिक पाया तयार केला होता़ त्यांना संघटनात्मक आणि प्रशासकीय दृष्टी होती़ त्यांच्या जाण्याने मी एक असा सहकारी गमावला आहे, ज्याच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक वष्रे काम केल़े हे आपणा सर्वाचेच न भरून येणारे नुकसान आह़े
– नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री़
मुंडेंचे अपघाती निधन झाल्याचे ऐकून मला प्रचंड दु:ख झाले आह़े या दु:खाच्या क्षणी मी मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन करतो़ हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळो, हीच माझी आणि माझ्या पत्नीची प्रार्थना आह़े मुंडेंच्या आत्म्यास सद्गती लाभो़
– डॉ़ मनमोहन सिंग, माजी पंतप्रधाऩ
गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने महाराष्ट्राने आणि देशाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्याने काम करणारा एक मोठा नेता गमावला आह़े त्यांचे अचानक जाणे धक्कादायक होत़े त्यामुळे मला अतिशय दु:ख झाले आह़े
-प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती
महाराष्ट्रातील प्रदीर्घ आणि व्यापक सार्वजनिक जीवन असणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी मुंडे हे एक होत़े त्यांच्या जाण्याने आपण एक अद्वितीय जनसेवक गमावला आह़े त्यांची अनुपस्थिती सर्वानाच कायम जाणवत राहील़
– हमीद अन्सारी, उपराष्ट्रपती
माझे मित्र आणि सहकारी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे मला प्रचंड धक्का बसला आह़े ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते होत़े समाजाच्या मागासलेल्या स्तरातून पुढे येऊन ते अत्युच्च ठिकाणी पोहोचले आणि अविश्रांतपणे लोकांची सेवा करीत राहिल़े
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मुंडे यांच्या मृत्यूमुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. मुंडे हे खरेखुरे तळागाळातून वर आलेले नेते होते.
-राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री
मी माझा उत्तम मित्र गमावला
-अरूण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री
मुंडे यांच्या आकस्मिक जाण्याने मला प्रचंड धक्का बसला आह़े
– सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री
मुंडे आपल्यात नाहीत, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही़ ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनसामान्यांचे नेते होत़े
– प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
मुंडे यांच्या जाण्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत.
-रविशंकरप्रसाद, दूरसंचार मंत्री
लोकनेते आणि पक्षाचे आधारस्तंभ असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने पितृछत्र हरपले आहे. सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी असामान्य कर्तृत्व गाजवले. दुसरे गोपीनाथ मुंडे होणे नाही.राज्यात पक्षाची उभारणी करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले.
-देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष़
मुंडेंच्या जाण्याने आपण एक उमदा लोकनेता गमावला आह़े
– शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख
मुंडेच्या अकाली निधनामुळे मला अत्यंत धक्का बसला आह़े
– राहुल गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष
गोपीनाथ मुंडे केवळ चांगले मंत्री नव्हते तर एक माणूस म्हणूनही ते फार चांगले होते. आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. या दु:खातून बाहेर पडण्याचे धैर्य त्यांच्या कुटुंबियांना मिळू देत आणि मुंडे यांच्या आत्म्याला शांती मिळू देत.
– लता मंगेशकर