Uttar Pradesh : सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारवर टीका केल्यास त्यांच्यावर कारवाई झाल्याच्या घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत. आता उत्तर प्रदेशात देखील एक अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी एका सरकारी रुग्णालयात डॉक्टर असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करत निलंबन करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधील एका सरकारी रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. झालं असं की, आम आदमी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सुलतानपूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील सरकारी रुग्णालयाच्या संदर्भातील काही तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निदर्शन केलं. रुग्णालयातील खराब आरोग्य सेवांमुळे नाराजी व्यक्त केली.

तसेच आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून निदर्शने करत होते. त्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत निवेदन देण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केला. त्यानंतर प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर प्रसाद घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की, या ठिकाणी रुग्णांना बाहेरून औषधं लिहून दिली जातात. एक्स-रे मशीनची कमतरता, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रक्त चाचण्यांचीही अडचण आहे. यावर योग्य तो तोडगा काढावा, अन्यथा पक्षातर्फे सीएमएस आणि सीएमओ यांच्या अंत्ययात्रा काढत आंदोलन करू, असा इशारा दिला.

त्यावर प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद यांनी त्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना एक विधान केलं. त्या विधानामुळे ते चांगलेच उडचणीत आले. आप कार्यकर्त्यांच्या विधानाला उत्तर देताना प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, “आमची अंत्ययात्रा का काढता? जर तुम्हाला अंत्ययात्रा काढायचीच असेल तर सरकार किंवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काढा. कारण आमचं सर्व गोष्टींवर नियंत्रण नसतं. जनतेचे रक्षक म्हणून सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जबाबदारी आहे.”

दरम्यान, प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या याच वक्तव्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने गंभीर दखल घेत या प्रकरणात संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.