परदेशी बँकांतील काळा पैसा परत आणण्याच्या मुद्दय़ावरून विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेल्या केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आठ काळा पैसाधारकांची नावे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली. यामध्ये ‘डाबर इंडिया’चे प्रवर्तक प्रदीप बर्मन यांच्यासह राजकोटस्थित सराफ आणि गोव्यातील खाण कंपनीच्या संचालकांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत आणखी
काळा पैसाधारकांची नावे जाहीर करण्याचे कबूल करतानाच केवळ ‘बेकायदा’ पैसे दडवणाऱ्यांचीच नावे उघड केली जातील, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘डाबर’चे प्रवर्तक प्रदीप बर्मन, राजकोटमधील सराफ पंकज चिमणलाल लोढिया आणि गोव्यातील तिंबले प्रा. लि. या खाण कंपनीच्या पाच संचालकांचा समावेश आहे. काळा पैसाप्रकरणी आधीच्या सुनावणीत केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून काळा पैसाधारकांची नावे जाहीर करण्यात असमर्थता दाखवली होती. यावरून भाजप सरकारवर टीकेची झोड उठत असतानाच सोमवारी अतिरिक्त प्रतिज्ञापत्राद्वारे केंद्राने ही नावे उघड केली. या सर्वावर खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे केंद्राने म्हटले आहे.
फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे डाबर यांचे नाव यादीत टाकल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, तर अन्य व्यक्तींची नावे इतर देशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समाविष्ट केल्याचे सांगतानाच, त्या देशांची नावे मात्र उघड केलेली नाहीत. परदेशी बँकांत खाती असलेल्यांची नावे त्यांच्याविरोधात करचुकवेगिरीचे पुरावे असल्याशिवाय जाहीर करता येणार नाहीत, असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
काळे धनवंत आणि बचावाची बाजू..
राजकोटचे धातू व्यापारी पंकज चिमणलाल लोढिया
बचाव : आम्ही आमची मालमत्ता प्राप्तिकर विवरण पत्रात जाहीर केली होती. आमचे स्वीस बँकेत खाते नाही, असे पंकज लोढिया यांनी सांगितले.
*****
डाबर इंडियाचे प्रवर्तक प्रदीप बर्मन
बचाव : प्रदीप बर्मन अनिवासी भारतीय असताना ते खाते उघडले होते व ते कायदेशीर आहे. आम्ही ती माहिती स्वयंस्फूर्तीने उघड केली होती व प्राप्तिकरही भरलेला होता, असे डाबरच्या प्रवक्त्याने सांगितले.
*****
तिंबले प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक राधा सतीश तिंबले, चेतन एस. तिंबले, रोहन एस. तिंबले, अॅना सी तिंबले, मल्लिका आर. तिंबले
बचाव : राधा तिंबले यांनी आपण प्रथम या प्रकरणाचा अभ्यास करून मगच प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले.