कर्नाटकमधील हिजाब वादाबद्दल उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हिजाब बंदीसाठी संपूर्ण देशात कायदा केला पाहिजे, अशी मागणी साक्षी महाराजांनी केली आहे. युपीमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावेळी उन्नावमध्ये मतदान करण्यासाठी आलेले साक्षी महाराज म्हणाले की, “निवडणुकीत हिजाबचा मुद्दा हा विरोधकांनी आणला आहे.”

ते म्हणाले, “मला वाटते की संपूर्ण देशात हिजाबवर बंदी घालण्यासाठी कायदा केला पाहिजे.” तर मतदानाबाबत साक्षी महाराज म्हणाले, “उन्नावमध्ये भाजपाला ६ पैकी ६ जागा मिळतील. योगी आदित्यनाथ यांना २०१७ मध्ये मिळालेला जनादेश, यावेळी त्यांचाच विक्रम मोडून, ​​प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल. यावेळी भाजपा ३५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येत्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्याविरोधात निवडणूक लढवावी,” असं आव्हान साक्षी महाराज यांनी दिलं.

दरम्यान, एबीपी न्यूजशी बोलताना साक्षी महाराज म्हणाले की, यावेळी भाजपासमोर कोणतेही आव्हान नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सबका साथ सबका विकास आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काम करण्याची पद्धत लोकांना आवडली आहे. त्यांनी ज्या प्रकारे गुन्हेगार आणि माफियांना तुरुंगात पाठवले, त्यामुळे जनतेमध्ये सुरक्षेबाबत विश्वास निर्माण झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज बुधवारी उन्नावसह उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनौ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर येथेही मतदान होत आहे. २०१७ मध्ये या ५९ जागांपैकी भाजपाने ५१ जागा जिंकल्या होत्या आणि समाजवादी पक्षाला चार तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या.