सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची विक्री प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार विक्री प्रक्रियेसाठी सरकार पुढील महिन्यात यासंदर्भात निविदा मागवण्याची शक्यता आहे. ज्या कंपन्यांना एअर इंडियाच्या खरेदीमध्ये रस असेल त्या कंपन्यांना खरेदीपूर्वी निविदा भराव्या लागणआर आहेत. यापूर्वी काही कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीत रस दाखवला होता.

या महिन्याच्या अखेरिसही लिलावाची प्रक्रिया पार पडू शकते, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहेय. यासाठी ई-निविदा प्रक्रियेचा वापर करण्यात येणार आहे. सरकार सध्या एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा विकरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एअर इंडियाच्या कर्मचारी संघटना या प्रस्तावाला विरोध करत आहेत.

५८ हजार कोटींचं कर्ज
एअर इंडियावर सध्या ५८ हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे. कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या एअर इंडियाला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ८ हजार ४०० कोटी रूपयांचा तोटा झाला होता. ऑपरेटिंग कॉस्ट आणि फॉरेन एक्सचेंज लॉसमुळे एअर इंडियाला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. त्यामुळे एअर इंडियाला विमानाच्या इंधानाचे पैसे भरणंही कठिण झालं आहे. अशातच इंधन कंपन्यांनी एअर इंडियाला इंधनाचा पुरवठा रोखण्याची धमकीदेखील दिली आहे.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात इंडियन ऑईल आणि अन्य दोन कंपन्यांनी एअर इंडियानं थकीत रक्कम न भरल्यानं एअर इंडियाच्या ६ विमानतळांवरील इंधन पुरवठा बंद केला होता. पुणे, विशाखापट्टणम, कोची, पाटणा, रांची आणि मोहाली विमानतळासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एअर इंडियानं ५ हजार कोटींची थकीत रक्कम न भरल्यानं कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता.