पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक वर्गात मोडणाऱ्या आणि व्हिसावर भारतात दीर्घकाळ वास्तव्य करून असलेल्यांना आता भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे आणि बँक खाते उघडण्याची परवानगी मिळणार आहे. याशिवाय, या लोकांना पॅनकार्ड आणि आधारकार्डाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या या स्थलांतरितांची संख्या तब्बल दोन लाख इतकी असून त्यामध्ये बहुतांश हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश आहे. यापैकी ४०० पाकिस्तानी हिंदू सध्या भारतातील जोधपूर, जैसलमेर, जयपूर, रायपूर, अहमदाबाद, राजकोट, कच्छ, भोपाळ, इंदौर यांसारख्या विविध शहरांमध्ये वास्तव्याला आहेत. दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणाऱ्या या लोकांना वेळोवेळी तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचा विचार करता सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली.