सुहग्रा ५० ही व्हायग्रा गोळी ज्या ग्राहकांनी विकत घेतली त्या ग्राहकांची माहिती सरकारी वेबसाइटवर लिक झाल्याचा धक्कादायक प्रकार आंध्रप्रदेशमध्ये घडला आहे. सुहग्रा ५० हे व्हायग्राचे जेनेरिक व्हर्जन आहे, ते स्वस्त असल्याने जास्त प्रमाणात खरेदी केले जाते. अशात १३ जून रोजी अन्ना संजीवनी स्टोअरमधून ज्या ग्राहकांनी या गोळ्या घेतल्या त्यांची नावे आणि खासगी माहिती लिक झाली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये याआधीही सरकारी वेबसाइटवरून महत्त्वाचा डेटा लिक झाला आहे. आंध्र प्रदेश सरकारची वेबसाइट वर्षाच्या सुरुवातीलाच लिक झाली होती. या वेबसाइटवरून आधारचा डेटा, जातीची प्रमाणपत्रे, धर्माची प्रमाणपत्रे, बँकेचे अकाऊंट नंबर आणि इतर माहिती, रेशन कार्ड नंबर, मोबाइल नंबर अशी अनेक प्रकारची माहिती लिक झाली होती. त्यावरून आंध्र प्रदेश सरकारवर टीकाही झाली होती. ती कुठे थांबते ना थांबते तोच आता व्हायग्राचे जेनेरिक व्हर्जन विकत घेणाऱ्या लोकांचा डेटा आणि नावे लिक झाली आहेत.
इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती लिक झाली आहे का? हे शोधणारे आंध्र प्रदेशातील रिसर्चर श्रीनिवास कोडाली यांना ही बाब सर्वात आधी लक्षात आली. श्रीनिवास कोडाली यांच्यावर डेटा लिस्टिंग, ऑर्डर आयडी, स्टोअर ऑपरेशनल आयडी, ग्राहकाचे नाव, फोन क्रमांक, औषधाचे तपशील, पैशांचा व्यवहार चेकने की रोखीने झाला हे पाहण्याची जबाबदारी आहे. त्यांनाच ही बाब सर्वात प्रथम लक्षात आली. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
आंध्र प्रदेश सरकारच्या निष्काळजीपणाचा फटका लोकांना वारंवार बसतो आहे. डिजिटल इन्फॉरमेशन सिक्युरिटी हेल्थ केअर अॅक्ट अर्थात दिशा आणि आरोग्य-कुटुंब कल्याण खाते हे ग्राहकांची माहिती गोपनीय रहावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र त्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आलेले नाही हेच या घटना दर्शवत आहेत. दरम्यान डिजिटल हेल्थ डेटा लिक होतोच कसा काय? त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना का केली जात नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. ज्यावर आत्तातरी सरकारकडे काहीही उत्तर नाही.