केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने सोमवारी पहाटे आपल्या वृद्ध आजी-आजोबांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी नातू अलीकडेच मानसिक आरोग्य केंद्रातून घरी परतला होता. यानंतर त्याने सोमवारी पहाटे वृद्ध आजी-आजोबांची हत्या केली. हत्येनंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, अकमल असं संशयित आरोपीचं नाव आहे. तो रविवारी तिरूर येथील मानसिक आरोग्य केंद्रातून घरी परतला होता. तो आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होता. आरोपीच्या आईने दुसरं लग्न केल्यानंतर, ती तिच्या दुसऱ्या पतीबरोबर राहायला गेली. तेव्हापासून आरोपी अकमल आपले आजोबा अब्दुल्लाह (वय-७५) आणि आजी जमीला (वय-६४) यांच्यासमवेत राहत होता.
सोमवारी सकाळी मृतांचे नातेवाईक त्यांच्या घरी किराणा सामान देण्यासाठी गेले होते. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच गुरुवायूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) केजी सुरेश हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी तातडीने चौकशी सुरू केली.
हेही वाचा- १५ दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा घेतला भयंकर बदला, नाशिकमध्ये तरुणाचा पाठलाग करत खून
आरोपीने आजी-आजोबांची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो कर्नाटकातील मंगळूर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत आहे. पुढील तपासासाठी आरोपीला केरळमध्ये परत आणण्यासाठी पोलिसांचं पथक मंगळूरला रवाना झालं आहे.
