नागपूर : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांना सैन्यदलात भरतीच्या वेळी महत्वाचे स्थान आहे. त्याच धर्तीवर अग्निपथ या सशस्त्र दलात भरतीच्या नवीन योजनेत देखील एनसीसी कॅडेटसना चांगली संधी राहणार आहे, असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकाऱ्यांचा दीक्षांत संचलन सोहळा (पासिंग आऊट परेड) कामठी येथील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधनी (ओटीए) मैदानावर बुधवारी सकाळी पार पडला.  देशभरातील विविध शाळा-महाविद्यालयातून आलेल्या ७०६ सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकाऱ्यांचे कामठी येथील प्रबोधनीत ४५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. दीक्षांत संचलन सोहळय़ानंतर लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.  त्यांना अग्निपथ योजनेबद्दल विचारले असता ते म्हणाले, एनसीसीच्या ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र धारकांना सशस्त्र दलात भरतीसाठी विशेष महत्त्व दिले जाते. अग्निपथ योजनेंर्तगत चार वर्षांकरिता सैन्य भरती केली जाणार आहे. यात एनसीसी कॅडेट्सना चार वर्षांसाठी ‘अग्नीवीर’ बनण्याची चांगली संधी आहे.  एनसीसीच्या उद्दीष्टाबद्दल ते म्हणाले, यवुकांना व कॅडेट्सना जबाबदार नागरिक बनवणे हा एसीसी चा मुख्य उद्देश आहे आणि एनसीसी कॅडेट जे अग्निवीर बनतील ते पुन्हा नागरी जीवनात परतल्यावर अधिक जबाबदार नागरिक बनतील, असेही ते म्हणाले. 

करोनानंतर सर्वात मोठी तुकडी

करोना काळात राष्ट्रीय छात्र सेना अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होऊ शकले नव्हते. प्रशिक्षणासाठी पात्र अधिकाऱ्यांची  प्रतिक्षा यादी वाढली होती. म्हणून यावेळेस सातशेहून अधिक सहयोगी  अधिकाऱ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. हे अधिकारी  एनसीसी प्रशिक्षण  देणारी शाळा, महाविद्यालय आणि समाज त्यांच्यातील दुवा आहेत. करोनाचे निर्बंध काढून टाकल्यानंतरची  ही पहिली मोठी तुकडी आहे. प्रतीक्षा यादीत असलेल्या जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही   लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग म्हणाले.

अग्निपथ योजनेवर राहुल गांधींची टीका

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. भाजपा सरकार लष्करी दलाच्या प्रतिष्ठा आणि शौर्याशी तडजोड करत आहे. सशस्त्र दलाची कार्यक्षमता कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. भारताला दोन आघाडय़ांवर परकीय आक्रमणाचे आव्हान असतानाच अग्निपथ योजना सशस्त्र दलांची कार्यक्षमता कमी करू शकते. भाजपा सरकारने लष्कराच्या अभिमान आणि परंपरेशी खेळणे थांबवावे, असे राहुल गांधी यांनी बुधवारी ट्वीट करून सांगितले.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी- वढेरा यांनीही सरकारच्या योजनेवर टीका केली. भाजपा सरकार सैन्यभरतीला आपली प्रयोगशाळा का बनवत आहे? सैनिकांच्या दीर्घकालीन नोकऱ्या सरकारला बोजा वाटत आहेत का? चार वर्षांचा नियम फसवा असल्याचे तरुणाई म्हणत आहे. माजी सैनिकही याबद्दल असहमत आहेत. सैन्यभरतीसंबंधित संवेदनशील विषयावर कोणतीही चर्चा नाही, काही गंभीर विचार नाही. केवळ मनमानी सुरू असल्याचे दिसून येत आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great opportunity ncc cadets statement lieutenant general gurbirpal singh ysh
First published on: 16-06-2022 at 00:02 IST