आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली परंतु अजूनही देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हुंडा प्रथा सुरू आहे. या प्रथेमुळे लाखो लोकांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे. लाखो संसार मोडले आहेत. परंतु ही प्रथा अद्याप सुरू आहे. अलिकडेच हुंड्याशी संबंधित एक प्रकरण हैदराबादमध्ये पाहायला मिळालं आहे. मोठा हुंडा आणि अधिक साहित्य मिळावं यासाठी एक नवरदेव विवाहमंडपात आलाच नाही. दुसऱ्या बाजूला वधू मात्र मंडपात नवरदेवाची वाट पाहत राहिली. त्यानंतर वधूच्या पित्याने हे लग्न मोडलं आणि पोलिसात धाव घेतली.

हैदराबादमधील मौलाली येथील बसचालक मोहम्मद जकारिया (वय २५) याचं लग्न ठरलं होतं. बंडलागुडा येथील रहमत कॉलनीत राहणाऱ्या २२ वर्षीय हीना फातिमा हिच्याशी तो निकाह करणार होता. निकाह रविवारी १९ फेब्रुवारी रोजी ठरला. निकाहची पूर्ण तयारी झाली होती. मंडप सजवला, पाहुण्यांना निमंत्रित केलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण शिजवलं जात होतं.

निकाहसाठी नवरी तयारी होऊन बसली, परंतु ऐनवेळी नवरदेवाने लग्नाला नकार दिला. त्याने हुंड्यात अधिक साहित्य मागितलं. मुलीच्या पालकांनी अधिक हुंडा देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर मोहम्मद जकारियाने लग्नास साफ नकार दिला. हळूहळू नातेवाईक मंडपातून बाहेर पडू लागले. होणाऱ्या जावयाला समजावण्यासाठी मुलीचे पिता मोहम्मद जकारियाच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी पाहिलं की नवरदेवाच्या घरी लग्नाची कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती.

हे ही वाचा >> धक्कादायक! दिल्लीत मंदिराशेजारी गोहत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांचंही दुसरं लग्न होतं!

मुलीच्या वडिलांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की, आम्ही हुंड्यात ज्या वस्तू मागितल्या होत्या त्या आम्हाला अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही या लग्नाला तयार नाही. त्यानंतर वधूच्या पित्याने नवरदेवाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने एकही शब्द ऐकून घेतला नाही. त्यानंतर वधू पक्षाला पोलिसात धाव घ्यावी लागली. वधूच्या पित्याने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे नवरा आणि नवरीचं दुसरं लग्न होतं. दोघांचंही एकेक लग्न आधी झालं आहे, परंतु काही कारणास्तव त्यांचे आधीचे संसार टिकू शकले नाहीत.