पीटीआय, नवी दिल्ली : वस्तू व सेवांच्या दरवाढीसह, त्यांची बळावलेली मागणी आणि व्यापाऱ्यांकडून वाढलेले कर-अनुपालन आणि सणासुदीच्या हंगाम याच्या एकत्रित परिणामामुळे सरलेल्या सप्टेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन हे १.४७ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत संकलनात २६ टक्क्यांची वाढ झाली असून, ती आगामी सणासुदीच्या महिन्यांमधील कर संकलनात वाढीच्या दृष्टीनेदेखील आश्वासक व शुभसूचक मानली जात आहे.

सप्टेंबरमधील संकलन हे ऑगस्टमध्ये झालेल्या १.४३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. मागील सलग सात महिन्यांत जीएसटी संकलन हे १.४० लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे. हे जीएसटी संकलनातील स्थिरता दर्शवते आहे. चालू महिन्यात दिवाळी असल्याने या महसुली प्रवाहाला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच जागतिक पातळीवरील इतर देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्थेची स्थिती समाधानकारक असल्याने जीएसटी महसुलावर सातत्यपूर्ण आधारावर सकारात्मक प्रभाव पडत आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या संबंधीच्या निवेदनात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल २०२२ मध्ये विक्रमी १.६७ लाख कोटी रुपयांचे संकलन झाले आहे.

सरलेल्या सप्टेंबर २०२२ मध्ये गोळा झालेला एकत्रित जीएसटी महसूल १,४७,६८६ कोटी रुपये आहे. यंदाच्या एकत्रित कर महसुलात, केंद्रीय वस्तू व सेवा करापोटी २५,२७१ कोटी रुपये, राज्य वस्तू व सेवा करापोटी ३१,८१३ कोटी रुपये, तर एकात्मिक वस्तू व सेवाकरापोटी ८०,४६४ कोटी रुपये (आयात वस्तूंवर गोळा केलेल्या ४१,२१५ कोटी रुपयांसह) आणि १०,१३७ कोटी रुपये उपकरातून (माल आयातीवर जमा झालेल्या ८५६ कोटी रुपये उपकरासह) गोळा झाले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील संकलनात अडीच हजार कोटींनी वाढ

मुंबई : राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये अडीच हजार कोटींनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात राज्याची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल, असा विश्वास राज्याच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात सप्टेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कराचे २१,४०३ कोटी रुपये एवढे संकलन झाले. ऑगस्टमध्ये १८,८६३ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील संकलनात सुमारे तीन हजार कोटींनी घटले होते, परंतु सप्टेंबरमध्ये पुन्हा संकलन चांगले झाले आहे. राज्यात सरासरी २० हजार कोटींपेक्षा अधिक मासिक संकलन होते. ऑगस्टमध्ये मोठा फटका बसला होता.  आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घटल्याचा फायदाही राज्याच्या संकलनावर झाल्याची माहिती वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सणासुदीच्या काळात खरेदी वाढते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळात अधिक संकलन होण्याचा अंदाज आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये राज्यात १६,५८४ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. यंदा हेच संकलन २१.४०३ कोटी झाले. म्हणजेच २९ टक्के वाढ झाली आहे. करोनाकाळातून तेव्हा राज्य बाहेर पडत होते. आता आर्थिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात देशात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर आहे. सप्टेंबरमध्ये कर्नाटक (९७६० कोटी), गुजरात (९,०२० कोटी), तमिळनाडू ( ८,६३७ कोटी) संकलन झाले आहे.