मे महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे आले आहेत. मे महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढून सुमारे १.४१ लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने आज (बुधवार) मे महिन्याच्या जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करताना ही माहिती दिली. या आकडेवारीनुसार, मे महिन्यात एकूण GST महसूल संकलन १,४०,८८५ कोटी रुपये होते. मात्र गेल्या दोन महिन्यांतील जीएसटी संकलनापेक्षा हा आकडा कमी आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर होते. त्याआधी, मार्चमध्ये जीएसटी संकलन १.४२ लाख कोटी रुपये होते.

अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, मे महिन्याच्या १,४०,८८५ कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) चा हिस्सा २५,०३६ कोटी रुपयांचा आहे. राज्य जीएसटी (एसजीएसटी) संकलन ३२,००१ कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी (IGST) संकलन ७३,३४५ कोटी रुपये होते. याशिवाय १०,५०२ कोटी रुपयांचा उपकरही जमा झाला. मार्चपासून सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन १.४० लाख कोटींच्या पुढे गेले आहे.

४४ टक्के वाढ झाली आहे –

मे २०२२ च्या महसूल संकलनात मे २०२१ च्या तुलनेत ४४ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात जीएसटी संकलन ९७,८२१ कोटी रुपये होते. जुलै २०१७ मध्ये जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर ही चौथी वेळ आहे की मासिक जीएसटी संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमध्ये एकूण ७.४ कोटी ई-वे बिल तयार झाले, जे मार्चमधील ७.७ कोटी ई-वे बिलांपेक्षा सुमारे चार टक्के कमी आहे.