वस्तू सेवा कर (जीएसटी) GST म्हणजे ‘गब्बर सिंग टॅक्स’ असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली होती. आता याच जीएसटीवरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदी सरकारवर तुटून पडल्या आहेत. वस्तू आणि सेवा कर म्हणजे ‘ग्रेट सेल्फिश टॅक्स’ असल्याचे टीकास्त्र ममता बॅनर्जींनी सोडले आहे. ‘लोकांचा छळ करण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था संपवण्यासाठी ग्रेट सेल्फिश टॅक्स लागू करण्यात आला,’ असा घणाघात त्यांनी ट्विटरवरुन केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदी म्हणजे आपत्ती होती, असे म्हणत नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी त्यांच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये काळा चौकोन ठेऊन निषेध नोंदवावा, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले. ‘लोकांना त्रास देण्यासाठी ग्रेट सेल्फिश टॅक्स (जीएसटी) लागू केला गेला. त्यामुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. नोटाबंदीची अंमलबजावणी करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले,’ असे बॅनर्जी यांनी म्हटले.

गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान मोदींनी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याचे सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयावर काँग्रेससह सर्वच विरोधकांनी आधीपासूनच टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात घट होईल, अशी भीती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलेला हा अंदाज खरा ठरला होता.

विरोधकांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली असली, तरी हा निर्णय योग्यच असल्याचे भाजपने आधीपासूनच म्हटले आहे. त्यामुळेच भाजपकडून ८ नोव्हेंबरला ‘काळा पैसाविरोधी दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. नोटाबंदीचा निर्णय यशस्वी ठरल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तर ८ नोव्हेंबरला विरोधकांकडून ‘काळा दिवस’ पाळण्यात येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst is great selfish tax says mamata banerjee slams modi government
First published on: 06-11-2017 at 16:34 IST