GTRI Warning to India : ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या थिंक टॅन्कने भारताला अमेरिका व इंडोनेशियाच्या ट्रेड डीलच्या (व्यापार करार) जाळ्यात अडकू नका असा इशारा दिला आहे. जीटीआरआयने स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की अमेरिका दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची रणनिती अवलंबत आहे. मात्र, यामुळे भारताचं मोठं नुकसान होऊ शकतं. जीटीआरआयने बुधवारी एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालाद्वारे त्यांनी भारताला इशारा दिला आहे.
भारताने अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यासाठी आयोजित चर्चेवेळी अमेरिकेला अधिक सवलती देऊ नये असं जीटीआरआयने म्हटलं आहे. यासाठी जीटीआरआयने अमेरिका व इंडोनेशियातील व्यापार कराराचं उदाहरण दिलं आहे.या करारामुळे इंडोनेशियाच्या दीर्घकालीन धोरणांवर व सार्वभौमत्वावर परिणाम होतील असंही संस्थेने म्हटलं आहे. त्यामुळे भारताने सावध राहावं.
“इंडोनेशियाने केलेली चूक भारताने करू नये”, जीटीआरआयचा सूचक इशारा
इंडोनेशियाने नुकताच अमेरिकेबरोबर व्यापार करार केला आहे. २२ जुलै रोजी हा करार जाहीर करण्यात आला. यानुसार इंडोनेशियाने अमेरिक उत्पादनांवरील ९९ टक्के कर रद्द केले आहेत. या करारामुळे इंडोनेशियाची बाजारपेठ अमेरिकेच्या औद्योगिक, तांत्रिक व कृषी उत्पादनांसाठी जवळजवळ पूर्णपणे खुली झाली आहे. मात्र अमेरिकेने इंडोनेशियन उत्पादनांसाठी अमेरिकेची बाजारपेठ पूर्णपणे खुली ठेवलेली नाही. अमेरिकेने इंडोनेशियन वस्तूंवर १९ टक्के कर लावला आहे. अमेरिकेने ४० टक्के कराचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, इंडोनेशियाने अमेरिकेसाठी पायघड्या घातल्यानंतर अमेरिकेने इंडोनेशियन वस्तूंवरील प्रस्तावित कर कमी केला. तसेच यूएएस एमएफएन कर यापुढेही कायम राहणार आहे. परिणामी उभय देशांमधील सदर कराराचा इंडोनेशियापेक्षा अमेरिकेलाच अधिक फायदा मिळत राहील.
इंडोनेशियाच्या अमेरिकेसाठी पायघड्या
इंडोनेशियाने अमेरिकेच्या एवढ्याच अटी मान्य केलेल्या नाहीत. इंडोनेशियाने अमेरिकेला अनेक सवलती दिल्या आहेत. तसेच देशाचं नुकसान होईल अशा शर्ती मान्य केल्या आहेत. जसे की या कराराद्वारे इंडोनेशिया २२.७ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तू खरेदी करणार आहे. यामध्ये १५ अब्ज डॉलर्सची ऊर्जा उत्पादने, ४.५ अब्ज डॉलर्सची कृषी उत्पादने आणि ३.२ अब्ज डॉलर्सची बोइंग विमाने खरेदी केली जाणार आहेत.