गोध्रा : गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत दोन मुलांसह अल्पसंख्याक समुदायाच्या १७ जणांच्या हत्येप्रकरणी २२ जणांची पुराव्याअभावी मुक्तता केली. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील हलोल शहरातील सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.

 पीडितांची २८ फेब्रुवारी २००२ रोजी हत्या करण्यात आली होती व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह जाळल्याचा आरोप होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांच्या न्यायालयाने मंगळवारी सर्व २२ आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली. त्यापैकी आठ जणांचा खटला प्रलंबित असताना मृत्यू झाला, असे बचाव पक्षाचे वकील गोपालसिंह सोलंकी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलंकी म्हणाले, की पंचमहाल जिल्ह्यातील देलोल गावात दोन मुलांसह अल्पसंख्याक समुदायाच्या १७ जणांची दंगलीत हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. फिर्यादी आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा करू शकले नाहीत व काही साक्षीदारही उलटले. पीडितांचे मृतदेह कधीही सापडले नाहीत. पोलिसांनी नदीच्या काठावरील एका निर्जन ठिकाणाहून अस्थी ताब्यात घेतल्या होत्या. परंतु त्या इतक्या जळाल्या होत्या, की पीडितांची ओळख पटू शकली नाही. देलोल गावात झालेल्या हिंसाचारानंतर हत्या व दंगलीशी संबंधित फौजदारी दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आणखी एका पोलीस निरीक्षकाने या घटनेच्या सुमारे दोन वर्षांनंतर पुन्हा गुन्हा दाखल केला व दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली २२ जणांना अटक केली होती.