तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या ‘अम्मा उपाहारगृहा’ची ख्याती केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही पसरली आहे. इजिप्तच्या शिष्टमंडळाने अलीकडेच या उपाहारगृहांची पाहणी करून त्याप्रमाणेच आपल्या देशातही ते सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केलेला असतानाच आता गुजरातनेही त्यांचे अनुकरण करण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारमार्फत चालविण्यात येणाऱ्या रास्त दरातील उपाहारगृहांची पाहणी अलीकडेच गुजरातमधील अधिकाऱ्यांच्या एका पथकानेही केली आहे.
दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या अम्मा उपाहारगृह प्रारूपामुळे बरेच काही शिकण्यास मिळाले, असे गुजरातच्या रोजगार-प्रशिक्षण आयुक्तालयातील अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले. जयललिता यांनी गरिबांसाठी घेतलेला पुढाकार लक्षणीय आहे, असे आयुक्तालयातील सहसंचालक एस. ए. पांडव यांनी म्हटले आहे. सदर उपाहारगृहातील अन्नपदार्थाचा दर्जा आणि पायाभूत सुविधा उत्तम असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला आहे. गुजरातमध्येही अशाच प्रकारची उपाहारगृहे सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांनीही रास्त दरातील उपाहारगृहांची साखळी सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली असून कर्नाटकमध्येही या योजनेचा अभ्यास केला जात आहे. तामिळनाडूत अशा प्रकारची आणखी ३६० उपाहारगृहे सुरू करण्याची घोषणा १ जून रोजी जयललिता यांनी केली.