Gujarat minister Bachu Khabad son Balvantsinh Khabad arrested : गुजरातचे मंत्री बाचू खाबड यांचा मुलगा बलवंतसिंह खाबड यांना दाहोद पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. दाहोद जिल्ह्यातील देवगड बारिया आणि धनपूर तालुक्यांमध्ये ७५ कोटी रुपयांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (मनरेगा) घोटाळ्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. बच्चू खाबड हे पंचायत आणि कृषी राज्यमंत्री आहेत. बलवंतसिंह खाबड आणि त्यांचा लहान भाऊ किरण यांनी दाहोद कोर्टातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्याच्या काही दिवसांतच ही अटक करण्यात आली आहे.

दाहोदचे पोलीस उपअधीक्षक जगदीश भंडीरी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, डिस्ट्रीक्ट रुरल डेव्हलपमेंट अथॉरिटी (डिआरडीओए) ने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, प्राथमिक तपासात घोटाळ्यामध्ये बलवंतसिह यांचा सहभाग आढळून आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

आम्ही प्राथमिक तपास केला आणि त्यामध्ये असे आढळून आले की बलवंतसिह खाबड यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एजन्सीकडून मनरेगा प्रोजेक्टसाठी वस्तूंचा पुरवठा केला जात होता, या एजन्सीने वस्तूंची संपूर्ण यादी न देता काही बिले सादर केली होती. सध्या तपास केला जात आहे आणि नेमकी किती रुपयांचा गैरव्यवहार झाला हे निश्चित झाले नाही, असे भंडारी म्हणाले. दरम्यान या प्रकरणात किरणला अद्याप अटक करण्यात आलेली नसून घोटाळ्यात त्याची भूमिका निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.

२४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, मनरेगा प्रकल्पासाठी साहित्य पुरवठ्याचे कंत्राट मिळवलेल्या कंपन्यांनी बोली लावली नव्हती, तरीही या कंपन्यांना अधिकृत प्रक्रिया डावलून कंत्राट देण्यात आले आणि बिले देखील मंजूर करण्यात आली होती. डीआरडीएच्या चौकशीत असेही समोर आले आहे की, कागदावर मंजूर झालेल्या पण प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या प्रकल्पासाठीची बिले मंजूर झाली होती. विशेषतः देवगड बारियामधील कुवा गावात ग्रामस्थांनी अशा प्रकारचा घोटाळा जिल्हा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

दाहोद जिल्हा पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणात पाच जणांना अटक केली होती, ज्यात मनरेगा ब्रँचचे दोन अकाऊंटंट जयवीर नागोरी आणि महिपालसिंह चौहान, ग्राम रोजगार सेवक कुलदीप बारिया आणि मंगलसिंह पटेलिया आणि टेक्निकल असिस्टंट मनीष पटेल यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे नेते अमित चावडा यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केली आहे. “भाजपाच्या ३० कार्यकाळात भ्रष्टाचार हा प्रशासनाचा पहिला गुण बनला आहे… प्रकल्प प्रत्यक्षात राबवले गेले नाहीत परंतु बिल मंजूर झाले आहेत अशा दाहोदमधील मनरेगा योजनेतील भ्रष्टाचाराबद्दल वारंवार तक्रारी असूनही सरकारने पावले उचलली नाहीत. काँग्रेस वारंवार लेखी आणि तोंडी तसेच विधानसभेत प्रश्नोत्ताराच्या माध्यामातून हा मुद्दा उपस्थित करत आहे, असे चावडा म्हणाले. सरकार प्रकरणाची चौकशी करत असल्याचे दाखवत आहे, पण ही सर्व धूळफेक आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली पाहिजे, त्यानंतर मोठी नावे समोर येतील, असेही ते म्हणाले.