Gujarat Pavagadh Ropeway Accident : गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ पावागडमध्ये शनिवारी (६ सप्टेंबर) दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मालवाहू रोपवे कोसळून मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लिफ्टमॅन, दोन मजूर आणि इतर दोन जणांचा समावेश आहे. पंचमहालच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची आणि यात जीवितहानी झाल्याची पुष्टी केली आहे. दुपारी ३.३० च्या दरम्यान ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. रोपवेची मूख्य तार तुटल्याने ही दुर्घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर त्यांनी बचावकार्य सुरू केलं. या दुर्घटनेनंतर आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या पोलीस व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत आणि दुर्घटनेचं कारण जाणून घेत आहेत. अद्याप प्रशासनाने दुर्घटनेचं कारण सांगितलेलं नसलं तरी रोपवेची मुख्य तार तुटल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

भाविकांमध्ये भीतीचं वातावरण

पावागड शक्तीपीठ गुजरातमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या दुर्घटनेनंतर मंदिर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांची पूर्ण मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. तांत्रिक तपास केल्यानंतरच या दुर्घटनेचं खरं कारण समोर येईल, असंही जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.

कशामुळे घडली दुर्घटना?

पीटीआय या वृत्तसंस्थेने या घटनेची अधिक माहिती देताना पंचमहालचे उपअधीक्षक हर्ष दुधात यांच्या हवाल्याने सांगितलं की बांधकामाशी संबंधित साहित्य एका मालवाहू रोपवेमधून नेलं जात होतं. त्याचवेळी रोपवेच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला आणि ट्रॉली खाली कोसळली. या दुर्घटनेत सहा जण दगावले आहेत.

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

तब्बल ८०० मीटर उंचीवर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना २,००० पायऱ्या चढाव्या लागतात किंवा केबल कारच्या सहाय्याने मंदिरात पोहोचता येतं. खराब हवामानामुळे लोकांना ये-जा करण्यासाठी बनवलेल्या प्रवासी रोपवेची सेवा आज सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. केवळ मालवाहू रोपवेच्या काही फेऱ्या चालवण्यात आल्या. प्रशासनाने प्रवासी रोपवेची सेवा बंद ठेवल्याने मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे.