gujarat police raid kolkata lawyer after he gifted wife Phone Crime News : कोलकाता येथील एका वकीलाने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून एक महागडा मोबाईल फोन दिला. पण यामुळे अचानक त्याच्या घरी गुजरात पोलीस येऊन धडकल्याच्या प्रकार समोर आला आहे. वकीलाने पत्नीला भेट म्हणून दिलेला फोन हा एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याची बाब पोलिसांनी उघड केली. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे गुन्ह्यात वापरण्यात आलेली उपकरणे नवीन म्हणून पुन्हा विकली जात असल्याच्या रॅकेटचा आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये तपास केला जात आहे.
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरूवातीला वकिलाने कोलकाता येथील मिशन रॉ एक्सटेंशन येथील एका दुकानातून ४९,००० रुपये किंमतीचा प्रिमियम स्मार्टफोन विकत घेतला होता. हा फोन योग्य पद्धतीने सील केलेला होता आणि याबरोबर जीएसटी बिल देखील देण्यात आले होते. सर्व प्रकारे हा फोन एकदम नवीन असल्याचे दिसून येत होते. त्याने फेब्रुवारी महिन्यात लग्नाच्या वाढदिवशी हा फोन पत्नीला भेट म्हणून दिला.
मात्र, काही आठवड्यानंतर गुजरातमधील राजकोट येथील पोलीस अधिकारी या जोडप्याच्या गरी पोहचले आणि त्यांनी वकीलाची पत्नी वापरत असलेला फोन हा एका सायबर गुन्ह्याच्या प्रकरणातील तपासणीत आढळून आल्याचे सांगितले. पोलिसांनी फोनची इंटरनॅशनल मोबाईल इक्युपमेंट आयडेंटीटी (IMEI) क्रमांक ट्रेस केला आणि तो एका ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात वापरलेल्या उपकरणाशी जुळल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान असे अरोप केले जात असताना जोडप्याने आपण फोन अधिकृतपणे विकत घेतला असून या सायबर फसवणुकीशी कसलाही संबंध नसल्याचे सांगितले. या प्रकरणाचे गंभीरता लक्षात घेता वकिलाने कोलकाता येथील स्ट्रीट पोलीस ठाणे गाठले आणि फोनची विक्री करणाऱ्या दुकानाविरोदात अधिकृत तक्रार दाखल केली.
त्यानंतर हे प्रकरण बोवबाजार पोलीस ठाण्यात हस्तांतरीत करण्यात आले, कारम हे दुकान या ठाण्याच्या हद्दीत येते. त्यानंतर पोलिसांनी हा फोन कोणी पुरवला याबद्दल दुकानाचा मालक आणि वितरक यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र दुकानाच्या कागदपत्रांच्या तपासणीत कोणताही गैरप्रकार समोर आलेला नाही, तसेच पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या प्रकरणी हा मोबाईल फोन पोहोचवणाऱ्या वितरकाच्या चौकशीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
हा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून याचा पूर्वीचा मालक कोण होता आणि त्याबरोबरच काही छेडछाड करण्यात आली होती का याबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. ही एकदाच घडलेली घटना होती की वापरलेल्या किंवा खराब झालेल्या मोबाईल फोन नवीन म्हणून पुन्हा विक्री करण्याच्या मोठ्या रॅकेटचा भाग आहे याचा तपास केला जात आहे.
हे हिमनगाचे टोक असू शकते असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, तसेच ते म्हणाले की यामागे जर मोठे रॅकेट असेल तर यामुळे अजाणतेपणे असे फोन खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांना मोठा धोका होऊ शकतो. लोकांना वाटते की ते नवीन फोन विकत घेत आहेत, पण ते कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात, असेही अधिकाऱ्याने सांगितले.