देशात बनावट नोटांमध्ये गुजरात अव्वल स्थानावर असून जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत गुजरातमधून ५०० आणि दोन हजार रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपूर्ण देशातून ६.७७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यात गुजरातममध्ये २.३१ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईशान्य भारतातील मिझोराम दुसऱ्या स्थानावर असून तिथून १.२३ कोटी रुपये पाठोपाठ उत्तर प्रदेशातून १.२१ कोटीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार ५०० रुपयाच्या ५,८४६ आणि दोन हजार रुपयांच्या २२,८३२ नोटा गुजरातमधून जप्त करण्यात आल्या. संपूर्ण भारतातून ५०० रुपयाच्या २५,५६८ आणि २ हजाराच्या ३३,३०४ नोटा जप्त केल्या.

गुजरात समृद्ध राज्य असून तिथे व्यवसाय, उद्योगधंदे जोरात सुरु आहेत. बनावट नोटांच्या वितरणाला इथे जास्त वाव आहे असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बनावट नोटांचे वितरण करताना ज्यांना पकडले त्यांचे मूळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये आहे. गुजरातमधून या नोटा मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु या राज्यांमध्ये पोहोचतात. या अशा नोटांमुळे अर्थव्यवस्था कमकुवत होते असे अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर सरकारने लगेचच २ हजार आणि पाचशेची नवी नोट बाजारात आणली. नोटाबंदीनंतरच्या पहिल्या वर्षात गुजरातमध्ये सर्वाधिक बनावट नोटा सापडल्या आहेत.

 

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat tops in fake currency
First published on: 29-03-2018 at 16:23 IST