गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार नाही, असे गुजरात काँग्रेसने म्हटले आहे. राष्ट्रवादी हा पक्ष भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोपही करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्ष विचारधारेच्या आधारावर भाजपशी लढणार आहे. त्यामुळे भाजपच्या जवळच्या कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. राष्ट्रवादी भाजपची ‘बी टीम’ असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाशी आघाडी होणे अशक्य आहे, असेही सोलंकी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील काँग्रेसचे नेते आणि आमदारांनी सोमवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादीशी आघाडी न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा सोलंकी यांनी केली. या बैठकीला गुजरातच पक्ष निरीक्षक अशोक गेहलोत हे उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा झाली. गुजरातमधील मागील दोन विधानसभा निवडणुका एकत्र लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर हा दुरावा अधिकच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदाराला उमेदवारी दिली होती. त्यांना मतदान केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार कंधाल जाडेजा यांनी जाहीरपणे सांगितले होते. तसेच जयंत पटेल यांनी मात्र आपण काँग्रेसच्या अहमद पटेल यांना मतदान केल्याचा दावा केला होता. पण हा दावा काँग्रेसने फेटाळला होता. पटेल यांना ४४ मते मिळाली होती. त्यातील ४३ मते ही काँग्रेसच्या आमदारांनी केली. तर जनता दलाच्या एका आमदाराने पटेल यांना मतदान केले, असे काँग्रेसने सांगितले होते. तर काँग्रेसने १ सप्टेंबरला वलसाडमधील परडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला निमंत्रित केले नाही, असा दावा राष्ट्रवादीने केला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे, असे स्पष्ट झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat assembly polls wont tie up with ncp bjp b team congress
First published on: 24-08-2017 at 10:40 IST