Fashion show in Gulmarg : जम्मू काश्मीर येथील गुलमर्ग येथे आयोजित करण्यात आलेला एका फॅशन शो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या फॅशन शोचे पडसाद राज्याच्या विधानसभेत देखील उमटल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाशी सरकारचा कसलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

काश्मीर येथील मुख्य धर्मगुरू मिरवाईज उमर फारूक यांनी रविवारी रमजान सुरू असताना आयोजित केलेला हा फॅशन शो अपमानजनक आणि अश्लील असल्याची टीका केली होती. यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावर उत्तर देताना म्हणाले की, “मी पाहिलेल्या फोटोंमधे दिसून येते की यामध्ये संवेदनशिलतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे आणि तेही या पवित्र महिन्यात (रमजान).”

शिवन अँड नरेश या डिझायनर लेबलच्या १५व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानेशुक्रवारी गुलबर्ग येथे या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोचे फोटो समोर आल्यानंर राज्यात वाद पेटला असून सरकारवर टीका केली जात आङे.

मिरवाईज यांनी या फॅशन शोबद्दल संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, “काश्मीर येथे पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली अशा पद्धतीची अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही.” तर पीपल्स कान्फरन्सचे अध्यक्ष साजद लोन यांनी याला सहज टाळता येण्यासारखा कार्यक्रम म्हटले आहे. श्रीनगरचे खासदार आगा रुहुल्लाह मेहदी आणि काँग्रेस नेत्या दीपिका पुष्कर नाथ यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनावर टीका केली होती.

सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेपूर्वी विधिमंडळात बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात आढळून आले आहे की गुलमर्ग येथे एका प्रायव्हेट पार्टीने आयोजित केलेला चार दिवसांचा कार्यक्रम होता. अब्दुल्ला हे सोमवारी आमदारांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे स्पष्टीकरण

या कार्यक्रमामुळे लोकांच्या भावना दुखवल्या गेल्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, “काही लोक म्हणाले की हे रमजानच्या पवित्र महिन्यात हे व्हायला नको होते, पण मला वाटते की मी तिथे जे पाहिले ते रमजान सोडा, वर्षातील इतरही कोणत्या महिन्यात होता कामा नये.”

“मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की सरकारची यामध्ये कसलीही भूमिका नाही. ती एक प्रायव्हेट पार्टी होती. त्यांनी कार्यक्रम खाजगी पद्धतीने खाजगी हॉटेलमध्ये आयोजित केला होता आणि त्यांनी खाजगी पद्धतीनेच त्याच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या होत्या,” असेही अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी सरकारकडून कसलीही परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच सरकारी कोणत्याच सुविधा त्यांनी वापरल्या नाहीत, सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाला चौकशी करण्याचे तसेच आवश्यकता असल्यास प्रकरण पोलिसांकडे सोपवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही अब्दुल्ला यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमर अब्दुल्ला म्हणाले की, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की सरकारची यात कोणतीही भूमिका नव्हती. जर त्यांनी परवानगी मागितली असती तर ती आम्ही नाकारली असती. हा एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित केलेला एक खाजगी कार्यक्रम होता, परंतु कायद्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.” तसेच त्यांनी हा फॅशन शो आयोजित करणाऱ्या लोकांनी त्यांच्या बुद्धीचा वापर केला नाही किंवा लोकांच्या भावनांकडे लक्ष दिले नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.