Suhel Seth on Gurugram Waterlogging: भारतात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठ्या शहरांमधील पायाभूत सुविधा किती कुचकामी आहेत, हे दिसून आले. विशेषतः राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम शहरात पावसाने कहर केला. देशातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये या ठिकाणी आहेत. देशाची सायबर सिटी म्हणून गुरुग्रामकडे पाहिले जाते. कोट्यवधींची घरे आणि कार्यालये या शहरात असताना पाणी तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. यावर आता प्रसिद्ध लेखक आणि व्यावसायिक सुहेल सेठ यांनी भाष्य केले असून भाजपा सरकारवर टीका केली आहे.

गुरुग्राममध्ये सोमवारी पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले. दिल्ली-गुरुग्राम राष्ट्रीय महामार्गावर अनेक तास वाहने अडकून पडली होती. या कोंडीत काही रुग्णवाहिकाही अडकल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावर्षी पावसामुळे गुरुग्राममध्ये असे चित्र वारंवार दिसून आले. यावर सुहेल सेठ यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्थानिक प्रशासन आणि सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच एक्सवर पोस्ट शेअर करत थेट माजी पंतप्रधान नेहरूंचा उल्लेख करत भाजपावर टीका केली.

नेहरूंवर दोष टाकू नका

सुहेल सेठ यांनी पाणी तुंबल्यामुळे हरियाणातील भाजपा सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “गुरुग्राममधील परिस्थिती सहन करण्यापलीकडे गेली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि विद्यमान मुख्यमंत्री नायब सैनी यांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आलेले आहे. भाजपाने काही गंभीर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. ११ वर्षांपासून तुमची इथे सत्ता आहे. यासाठी आता नेहरूंना दोष देऊन चालणार नाही.”

गुरुग्रामधील श्रीमंत लोक झोपडपट्टीत राहतात

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुहेल सेठ म्हणाले की, गुरुग्राममध्ये कोका कोला, हिरो मोटोकॉर्प अशा मोठ्या कंपन्या आहेत. पाच मोठी खासगी रुग्णालये आहेत. अनेक श्रीमंत लोक कोट्यवधींची घरे विकत घेऊन येथे राहत आहेत. मात्र शहराला कोणत्याही सुविधा नाहीत. शहराचा विकास होत असताना दूरदृष्टी ठेवून विकास केलेला नाही. एखाद्या झोपडपट्टीत राहावे, तसे इथले श्रीमंत लोक राहत आहेत.

हरियाणा सरकारवर सुहेल सेठ यांनी टिका केल्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना गुरुग्राम शहराचा ताबा घेण्याची विनंती केली होती. गुरुग्राममधील स्थानिक प्रशासन अतिशय कुचकामी असून शहराला पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सुहेल सेठ म्हणाले होते की, दरवर्षी सरकारच्या मदतीशिवाय येथे व्हेनिस शहर तयार होते आणि लोक त्याची मजा घेतात. (इटलीतील प्रसिद्ध व्हेनिस शहर समुद्रावर वसलेले असून तिथे रस्त्यांऐवजी कालवे आहेत) आम्ही रस्त्यावर कचरा टाकतो, आमच्याकडे ट्राफिक सिग्नलपेक्षा अधिक दारूची दुकाने आहेत. शाळांपेक्षा जास्त बार आहेत.