गेल्या ३० वर्षांपासून अर्थात १९९१ सालापासून चालू असणारा ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ मंदिर वाद आता चर्चेत आला आहे. वाराणसीतील जिल्हा सत्र न्यायालयाने मशिदीत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार आजपासून मशिदीत सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, या सर्वेक्षणात वादाच्या राहिलेल्या वुजुखाना भागाचं सर्वेक्षण केलं जाऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उर्वरीत मशिदीचं सर्वेक्षण भारतीय पुरातत्व खात्याकडून करण्यात येत आहे.

मशिदीत ASI चं पथक दाखल!

आज सकाळीच भारतीय पुरातत्व खात्याचे अर्थात ASI च्या ३० अधिकाऱ्यांचा चमू ज्ञानवापी मशीद परिसरात दाखल झाला. त्यांच्यासमवेत चार महिला याचिकाकर्त्या व हिंदुंच्या बाजूच्या चार महिला वकील उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुस्लीम पक्षकारांच्या बाजूने अधिकृत वकिलांनाही सर्वेक्षणाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमवीर मशीद परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मशिदीच्या परिसरातील २ किलोमीटरच्या परिघात वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

ज्ञानवापी मशिदीत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे कोर्टाकडून आदेश, पण ‘या’ अटी पाळाव्या लागणार

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

दरम्यान, एकीकडे सर्वेक्षणाला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे आज यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मशीद व्यवस्थापन समितीने या वादात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिराच्या जागी बांधण्यात आली आहे, त्यामुळे आपल्याला मशिदीत प्रार्थना करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका पाच हिंदू महिलांनी दाखल केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या महिलांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.