एका देशातून दुसऱ्या देशात जाणारी नदी किंवा पर्वत रांगावगैरे सारख्या गोष्टींबद्दल तुम्ही अनेकदा वाचले असणार. अनेक देशांच्या सीमा या नदी किंवा जंगलांनी ओळखल्या जातात. परदेशात अनेक ठिकाणी काही घरे किंवा हॉटेलसारख्या गोष्टी अर्धी या देशात तर अर्धी त्या देशात असा अजब प्रकार दिसून येतो. मात्र आपल्या महाराष्ट्रात असे एक रेल्वे स्थानक आहे जे दोन राज्यांमध्ये वाटले गेले आहे. म्हणजे या स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात येतो तर अर्धा गुजरातमध्ये. हो खुद्द रेल्वे मंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट केल्याने हे स्थानक चर्चेत आलं आहे. या स्थानकाचं नाव आहे नवापूर रेल्वे स्थानक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यामध्ये नवापूर हे छोटे शहर आहे. नवापूर पंचायत या शहराचा कारभार पाहते. या शहरातून जाणारा रेल्वे मार्ग गुजरातमध्ये जातो. नवापूर रेल्वे स्थानक अगदी महाराष्ट्र गुजरात सिमेवर असल्याने त्याचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या सिमेत आहे तर अर्धा गुजरातच्या. महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिनाच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या स्थानकाचा फोटो ट्विट केला आहे.

ते म्हणतात, राज्यांच्या सिमांमुळे वेगळे झालेले पण रेल्वेमुळे एकत्र असलेले स्थानक. नावपूर रेल्वे स्थानक हे दोन राज्यांमध्ये असलेले स्थानक आहे. या स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा गुजरातमध्ये आहे. नवापूर हे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असल्याचे गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटनंतर अनेकांनी या स्थानकाचे फोटो गोयल यांच्या ट्विटला रिप्लाय म्हणून ट्विट केले आहेत.

स्थानकावर असलेला एक दिशादर्शक स्तंभ

असं दिसतंय नवीन नवापूर स्थानक

जरी नवापूर स्थानक हे दोन राज्यांत असणारे स्थानक असले तरी भारतातील ते असे एकमेव स्थानक नाहीय. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सिमेवरही भवानी मंडी नावाचे स्थानक आहे. या स्थानकाचा अर्धाभाग राजस्थानमध्ये आहे तर अर्धा मध्य प्रदेशमध्ये.

राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सिमेवरील भवानी मंडी स्थानक

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half of navapur railway station is in maharashtra while the other half is in gujarat
First published on: 03-05-2018 at 14:14 IST