निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने
गाझा, जेरुसलेम : इस्रायलने गाझा पट्टीमध्ये दोन दिवसांपासून लष्करी हल्ला सुरू केला असला तरी हमासची भुयारे नष्ट करण्याचे मोठे आव्हान आमच्या सैन्यापुढे असल्याचे इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव्ह गॅलंट यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. हमासकडून वापरण्यात येणाऱ्या भुयारांचे प्रचंड मोठे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली ही कारवाई दीर्घकाळ चालेल आणि कठीण असेल याची कबुली त्यांनी दिली.
इस्रायलने गाझामध्ये शिरून लष्करी कारवाई करण्यासाठी सीमेवर आपल्या फौजा सज्ज ठेवल्या आहेत. त्यानुसार, गुरुवारपासून इस्रायली फौजांनी गाझामध्ये हल्ल्याला सुरुवात केली. त्याच्या जोडीला इस्रायलची लढाऊ विमाने आणि ड्रोननी हवाई हल्लेदेखील सुरू ठेवले. या हल्ल्यांमध्ये मुख्यत: गाझा पट्टीच्या सीमाभागांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या सैन्यामार्फत देण्यात आली. दुसरीकडे, इस्रायलच्या हल्ल्यांविरोधात न्यूयॉर्क शहरासह जगभरात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा >>> कायदा संहिता बदल अहवाल स्वीकृती लांबणीवर; संसदीय समितीची ६ नोव्हेंबरला बैठक
या हल्ल्यांमुळे शत्रू उघड होतो, अतिरेक्यांना ठार मारता येते, स्फोटके व इस्रायलविरोधात हल्ल्यासाठी वापरण्यात येणारे लाँच पॅड दूर करता येतात अशी माहिती इस्रायली सैन्याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी दिली. युद्धबळींवर लक्ष ठेवणाऱ्या गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी मृतांची संख्या आणि त्यांचे परिचय क्रमांक यांची तपशीलवार यादी जाहीर केली. त्यानुसार, या युद्धामध्ये मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या ७,३००पेक्षा जास्त झाली आहे. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात १,४०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हमासच्या ताब्यात किमान २२९ ओलीस आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये अनेक निवासी भाग पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहेत. त्यामध्ये इस्रायल-हमासदरम्यान झालेल्या आतापर्यंतच्या कोणत्याही युद्धापेक्षा जास्त जीवितहानी आणि मालमत्तेची हानी झाली आहे. गाझा पट्टीतील २३ लाखांपैकी १४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी घरदार सोडून स्थलांतर केले आहे.
‘गाझामध्ये मानवतेला कधी जाग येणार?’
नवी दिल्ली : इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात लहान मुलांसह हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे, याबाबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी शुक्रवारी दु:ख व्यक्त केले. गाझामध्ये मानवता कधी जागी होणार, असा सवालही त्यांनी केला. युद्धामुळे गाझामधील सात हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही येथील हिंसा थांबलेली नाही, असे प्रियंका यांनी ‘एक्स’वर नमूद केले असून या भागात प्रत्येक आंतरराष्ट्रीय कायदा चिरडला आहे, असा दावा केला.
हल्ल्यांविरोधात निदर्शने
शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध करणारी आणि पॅलेस्टाईनला समर्थन देणारी निदर्शने गाझा, पश्चिम किनारपट्टी, लेबनॉन, जॉर्डन, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी काढण्यात आली. त्याशिवाय न्यूयॉर्क शहरामध्येही इस्रायलचा निषेध करण्यासाठी अनेक निदर्शक रस्त्यावर उतरले.
थरूर यांच्या विधानावरून वाद
तिरुवअनंतपुरम : इंडियन युनियन मुस्लीम लीगने (आययूएमएल) पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. इस्रायलवर ७ ऑक्टोबरला दहशतवादी हल्ला झाला असे थरूर म्हणाले होते. थरूर यांच्या काही टिप्पणी इस्रायलची भलामण करणाऱ्या होत्या अशी टीका माकपचे नेते आणि माजी आमदार एम स्वराज यांनी केली. त्यानंतर आपण नेहमीच पॅलेस्टिनी लोकांच्या बाजूने राहिलो आहोत असे स्पष्टीकरण थरूर यांनी दिले.
भारत-ओमान चर्चा
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ओमानचे परराष्ट्रमंत्री बद्र अल्बुसैदी यांच्याशी चर्चा केली. या वेळी दोघांमध्ये हमास-इस्रायल युद्धानंतर पश्चिम आशियातील बिकट परिस्थितीबद्दल संभाषण झाले. गाझामध्ये तातडीने युद्धविराम होणे आवश्यक असल्याचे आग्रही मत मांडल्याचे अल्बुसैदी यांनी सांगितले.