अवघ्या काही दिवसांपूर्वीच पंजाब काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सहा महिन्यांवर राज्य विधानसभेच्या निवडणुका आलेल्या असतानाच पाटीदार समाजाचा मोठा पाठिंबा असलेले युवा नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाला रामराम केला आहे. यासंदर्भात ट्वीट करून हार्दिक पटेल यांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर गुजरातमधील मतांची गणितं जुळवण्याचं आव्हान असणार आहे.

यासंदर्भात हार्दिक पटेल यांनी ट्वीट केलं असून त्यात त्यांनी पाठवलेलं पत्र देखील शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये हार्दिक पटेल यांनी भविष्यात गुजरातसाठी सकारात्मकपणे काम करणार असल्याचं सांगत नव्या राजकीय वाटचालीचे देखील संकेत दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हटलंय ट्वीटमध्ये?

हार्दिक पटेल यांनी ट्वीटमध्ये शेअर केलेल्या पत्रासोबत एक संदेश पोस्ट केला आहे. यात, “आज मी हिंमत करून काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचं माझे सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मी असं मानतो की माझ्या या निर्णयानंतर भविष्यात गुजरातसाठी खरंच सकारात्मक पद्धतीने काम करू शकेन”, असं त्यांनी म्हटलं आहे.