BJP MP Ram Chander Jangra Controversy: मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा नेते कुंवर विजय शाह यांनी मध्यंतरी भारतीय सैन्य दलाच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता हरियाणामधील भाजपाचे नेते, राज्यसभेचे खासदार रामचंद्र जांगरा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या महिलांनी आपल्या घरातील पुरूष गमावला, त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. “पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यावेळी पर्यटक महिलांनी हात जोडून पतीच्या जीवाची भीक मागण्याऐवजी लढायला हवे होते”, असे विधान खासदार रामचंद्र जांगरा यांनी केले आहे.
भाजपा खासदार रामचंद्र जांगरा म्हणाले, “पहलगाम येथील पर्यटक महिलांचे कुंकू पुसण्यात आले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास वाचला असता तर त्यांच्यासमोर पतीवर गोळ्या झाडण्याची कुणाची हिंमत झाली नसती. अतिरेक्यांशी लढता लढता त्याही शहीद झाल्या असत्या. त्या महिलांमध्ये शौर्य, धाडस नव्हते. म्हणून त्या हात जोडून विनवणी करत होत्या.”
रामचंद्र जांगरा पुढे म्हणाले, महिलांनी जर अतिरेक्यांशी दोन हात केले असते तर कमी लोक मारले गेले असते. जर सर्व पर्यटक अग्नीवीर असते तर निश्चितच त्यांनी अतिरेक्यांना झुंज दिली असती. आपल्याला राणी अहिल्याबाईंप्रमाणे आपल्या भगिनींमध्ये पुन्हा एकदा शौर्याची भावना जागृत करावी लागेल.
अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत असताना रामचंद्र जांगरा यांनी हे विधान केले आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील २५ जण पर्यटक होते. तर एक व्यक्ती स्थानिक घोडेस्वार होती.
दहशतवादात ज्यांचा बळी गेला त्यांच्याबद्दल असंवेदनशील विधान केल्याबद्दल आता रामचंद्र जांगरा यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसने एक्स हँडलवर जांगरा यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे.
खासदार रामचंद्र जांगरांनी काय स्पष्टीकरण दिले?
द प्रिंट संकेतस्थळाने खासदार रामचंद्र जांगरा यांची या प्रकरणी प्रतिक्रिया घेतली आहे. तेव्हा ते म्हणाले की, मी राणी अहिल्याबाई यांच्या जयंतीनिमित्त बोलत होतो. याचा संदर्भ देताना मी म्हणालो की, पहलगाममधील पर्यटक महिला राणी अहिल्याबाई होळकर किंवा राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या वीरांगणा असत्या तर त्यानी अतिरेक्यांशी दोन हात केले असते. त्या अतिरेक्यांसमोर हात जोडून विनवणी करत नसत्या.