Gurugram Crime : हरियाणामधील गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी संबंधित महिलेसह एकूण ५ जणांना पोलिसांनी अटक केलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे गुरुग्राममध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेने या पाच जणांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

गुरुग्रामध्ये राहणाऱ्या एका महिलेचा तिच्या प्रियकराबरोबरचा अश्लील व्हिडीओ तिच्या मुलीने पाहिला आणि तिच्या वडिलांनाही दाखवला. त्यामुळे या महिलेच्या प्रेमसंबंधाचा सुगावा तिच्या पतीला लागला. त्यामुळे पती आपल्यावर रागवेल या भितीने या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. पतीला जेव्हा पत्नीच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली तेव्हाच पत्नीने पतीचा काटा काढण्यासाठी कट रचल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रम आणि त्याची पत्नी हे गुरुग्राममध्ये मुलीसह राहत होते. दरम्यान, २८ जुलै रोजी पत्नी सोनी हिने गुरुग्राम पोलिसांकडे तक्रार केली आणि तिचा पती बेपत्ता असल्याचं सांगितलं. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा दुसरी तक्रार दाखल आणि शेजारी असलेल्या रवींद्रने मार्च २०२५ मध्ये तिचा पती कामावर गेल्यानंतर बलात्कार केल्याचा आरोप केला. तसेच रवींद्रने घटनेचा व्हिडीओ बनवल्याचाही आरोप तिने केला. या बरोबरच आरोपीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं.

त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी रवींद्रला अटक केलं आणि चौकशी केली. यावेळी त्याने चौकशी दरम्यान तक्रारदार महिलेचं आणि त्याचं प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. या घटनेबाबत एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “सोनी आणि रवींदरमध्ये एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. यावेळी आरोपीने त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. मात्र, हा व्हिडीओ सोनीच्या मुलीने पाहिला. तसेच या व्हिडीओबाबत मुलीने तिच्या वडिलांनाही सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या पत्नी आणि तिचा प्रियकर रवींद्रने मिळून पती विक्रमचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानंतर या विक्रमची हत्या केली. तसेच हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी यूट्यूबवर विविध वेगवेगळ्या पद्धती शोधल्या”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, २६ जुलै रोजी रवींद्र आणि त्याच्या साथीदारांनी विक्रम कामावरून घरी परतत असताना त्याला कारमध्ये बसवलं. त्यानंतर त्याचा दोरीने गळा दाबून खून केला आणि एका ठिकाणी मृतदेह पुरला. मात्र, यासाठी रवींद्रच्या काकांनी मदत केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी रवींद्रने विक्रमचा मृतदेह कुठे पुरला? याची माहिती सांगितल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. या सर्व घटनेदरम्यान विक्रमची पत्नी ही तिचा प्रियकर रवींद्रच्या संपर्कात होती. मात्र, तिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. या संपूर्ण घटनेत आता पोलिसांनी एकूण ५ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.