मनोहर लाल खट्टर यांनी आज(दि.२७) सलग दुसऱ्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्री पदाची व गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत जननायक जनता पार्टीचे (जजपा) नेते दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी दोघांनाही शपथ दिली. रविवारी देशभर दिवाळीचा उत्सव साजरा होत शपथविधी सोहळा दुपारी सव्वादोनच्या सुमारास पार पडला.

आजच्या शपथग्रहण सोहळ्यात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली. अन्य काही कॅबिनेट मंत्री देखील आज शपथ घेतील अशी शक्यता यापूर्वी वर्तवण्यात येत होती. शपथविधीसाठी जजपा नेते दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला हे देखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यापूर्वीच चौटाला यांना दोन आठवड्यांची फर्लो मंजूर झाल्याने त्यांची तिहार कारागृहातून सूटका झाली व ते शपथविधीला उपस्थित राहिले. शिक्षक भरती घोटाळ्यात चौटाला दोषी आढळल्याने विशेष सीबीआय न्यायालयानं दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

शपथग्रहण कार्यक्रमाला काँग्रेस नेता भूपिंदर सिंह हुड्डा, अकाली दलाचे नेता प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर बादल हे देखील पोहोचले होते. भाजपाला दुष्यंत यांच्या जेजेपीचा पाठिंबा मिळण्यामागे प्रकाश सिंग बादल यांची प्रमुख भूमिका असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, शपथ सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे देखील उपस्थित होते. खट्टर सरकारमध्ये १३ मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जजपाच्या दोन मंत्र्यांचा समावेश असू शकतो. अनिल विज यांच्यासारख्या जुन्या नेत्यांसह काही युवा आणि नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

संभावित मंत्रीपद कोणाला –
अनिल विज, घनश्याम सर्राफ, संदीप सिंह, अभय सिंह यादव, सुभाष सुधा, सीमा त्रिखा, कंवरपाल गुर्जर या नेत्यांची नावं मंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. याशिवाय धीर सिंगला, नरेंद्र गुप्ता, डॉ. कमल गुप्ता, ज्ञान चंद गुप्ता आणि दीपक मंगला या नावांचीही चर्चा आहे. हरयाणामध्ये सुभाष बराला, कॅप्टन अभिमन्यु आणि ओम प्रकाश धनखड यांसारखे दिग्गज नेता आणि मागील कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेल्या या सर्वांचा पराभव झाल्याने महिपाल ढांडा, कमलेश ढांडा, जेपी दलाल आणि प्रवीण डागर यांसारख्या जाट समाजाच्या नेत्यांपैकी एकाला मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

हरयाणात दहा जागा जिंकणाऱ्या चौटाला यांच्या ‘जेजेपी’च्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दावा भाजपाने राज्यपालांकडे केला होता. त्यानुसार राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. भाजपाचे ४०, जेजेपीचे १० आणि सात अपक्ष मिळून येथे सरकार स्थापन होतंय.