सराव सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावून लयीत असल्याचे सिद्ध करूनही दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमलाच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ५ जूनला भारताविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या सामन्यात आपला अंतिम ११ जणांच्या संघात समावेश होईल की नाही, याविषयी खुद्द अमला साशंक आहे.

अमला हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून गणला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २७ शतके झळकावली आहेत. मात्र, धावगती कमी राखण्याच्या शैलीमुळे त्याच्या स्थानाबाबत अनिश्चितता आहे. अमलाने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या सराव सामन्यांमध्ये अनुक्रमे ६५ आणि नाबाद ५१ धावांची खेळी केली. मात्र, तरीही दक्षिण आफ्रिकेकडून यष्टीरक्षक क्विंटन डी’कॉक याच्यासमवेत सलामीला जाण्याची शाश्वती त्याला वाटत नाही. दुसरा युवा सलामीवीर एडन मार्कराम हा अधिक आक्रमक असल्याने कदाचित त्याला स्थान मिळण्याची शक्यता आहे.

त्याविषयी अमला म्हणाला की, ‘‘संघाकडून खेळताना अधिकाधिक धावा काढणे, हे नेहमीच महत्त्वाचे असते. मी अंतिम ११ जणांच्या संघात राहणार की नाही, ते मला माहिती नाही. मला जे शक्य असते, ते मी करतो. मात्र, अखेरीस निर्णय हा संघ व्यवस्थापनानेच घ्यायचा असतो.’’ अमलाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी ९० धावांची आवश्यकता आहे.