दोन बायकांचा खर्च भागविण्यासाठी बाइक चोरी करणाऱ्या हमालाला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. ५ जुलैला मंत्री मॉलच्या होन्डा डिओ बाईक चोरताना पोलिसांनी मुरली रामराव या आरोपीला अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १५ लाखांची रोकड देखील जप्त केली.
व्यवसायाने मुळचा हमाल असलेल्या मुरलीला दोन पत्नी आहेत. आपल्या या दोन बायकांचे लाड पुरविण्यासाठी आर्थिकरित्या कमकुवत असलेल्या मुलरलीने शेवटीचा चोरीचा मार्ग अवलंबला. दोन्ही पत्नींचे गरजा पूर्ण करण्यासाठी मुरलीने दुचाकी गाड्या चोरी करण्यास सुरुवात केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपीने आतापर्यंत २५ हून अधिक दुचाकी चोरुन विकल्या आहेत. मुरलीने दुचाकी वाहनाच्या चोरीसाठी विशेष शक्कल लढवली होती. त्याच्या दोन बायका वेगवेगळ्या ठिकाणी राहयच्या. त्यातील एकीला भेटायला जाताना मुरली बसने जात असे. मात्र, परतीच्या वेळी तो बसने न येता चोरी केलेल्या दुचाकीवरून परतायचा. ज्यावेळी त्याची बायको त्याला दुचाकी कोणाची आहे, असे विचारायची त्यावेळी तो मित्राची गाडी असल्याचे सांगत विषयांतर करत असे. त्याच्या चोरीच्या धंद्याची दोन्ही बायकांना कल्पना नव्हती. पण आपल्याला संसारासाठी चोरी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.