Man Spying for Pakistan : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सहा जणांना हरियाणामधून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा देखील समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणामुळे देशात मोठी खळबळ उडाली. यानंतर आता आणखी एक अशाच प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

बीएसएफ आणि नौदलाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी गुजरात एटीएसने एका व्यक्तीला अटक केली आहे. सीमा सुरक्षा दल आणि भारतीय नौदलाशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप सहदेव सिंग गोहिल या व्यक्तीवर करण्यात आला आहे. गुजरात एटीएसने कच्छच्या सीमावर्ती भागातून २८ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला अटक केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. अटक केलेल्या व्यक्तीवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. गेल्या आठ महिन्यांत हेरगिरीच्या आरोपाखाली गुजरातमधून झालेली ही तिसरी अटक असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, आरोपी सहदेवसिंह गोहिलने भारतीय नौदलाशी संबंधित संवेदनशील छायाचित्रे आणि व्हिडीओ अदिती भारद्वाज या नावाने ओळखणाऱ्या एका व्यक्तीला पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. एटीएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गोहिल २०२३ च्या मध्यात व्हॉट्सअॅपद्वारे भारद्वाजच्या संपर्कात आला. भारद्वाजने स्वतःची ओळख पाकिस्तानी गुप्तचर सेवांची एजंट म्हणून करून दिल्याचं एटीएस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

गोहिलला कच्छ प्रदेशातील बीएसएफ आणि नौदलाच्या सुरक्षा प्रतिष्ठानांचे काही बांधकामाधीन फोटो देण्यात सांगितलं होतं, असाही दावा करण्यात आला होता. २०२५ च्या सुरुवातीला गोहिलने त्याच्या आधार ओळखपत्राचा वापर करून एक नवीन सिम कार्ड मिळवलं होतं. त्या डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप सक्रिय केलं, जे त्याने नंतर भारद्वाजला दिलं. एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो त्या चॅनेलद्वारे तिला वर्गीकृत माहिती पाठवत राहिला. माहितीच्या बदल्यात त्याला मध्यस्थाकडून ४०,००० रुपये रोख मिळाले असा आरोप करण्यात आलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गुप्तचर संस्थांनी पुष्टी केलेल्या तांत्रिक देखरेख आणि मानवी गुप्तचर माहितीच्या तपासानंतर एटीएसने १ मे रोजी गोहिलला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गोहिल आणि अदिती भारद्वाज दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोहिलच्या फोनमधून महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला होता, अशी माहिती देखील चौकशीतून समोर आली आहे.