वृत्तसंस्था, नवी दिल्ली : न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘न्यायवृंद’ (कॉलेजियम) पद्धतीचा फेरविचार करण्याबाबत याचिका दाखल करून घेण्यास सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी होकार दिला. याचिका तातडीने सुनावणीला घेण्याची याचिकाकर्ते अ‍ॅड. मॅथ्यू नेदुमपारा यांची मागणी मात्र मान्य झाली नाही. योग्य वेळी याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध केली जाईल, असे न्या. चंद्रचूड, न्या. हिमा कोहली आणि न्या. जे. बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. १९९३ साली नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानंतर न्यायवृंद पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे रिट याचिकेद्वारे याला आव्हान देता येऊ शकते का, हेदेखील पाहावे लागेल, असेही न्या. चंद्रचूड यांनी म्हटले आहे. ‘राष्ट्रीय न्यायाधीश नियुक्ती आयोग कायद्या’मध्ये सुधारणेची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात विधिमंत्री किरण रिजिजू यांनी न्यायवृंद प्रक्रिया अपारदर्शक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता यावर थेट सर्वोच्च न्यायालयात चर्चा झडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगासाठी ‘न्यायवृंद’ पद्धतीला विरोध

नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अन्य निवडणूक आयुक्त यांची निवड करण्यासाठी ‘न्यायवृंद’सारखी पद्धत राबवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात कडाडून विरोध केला. अशा प्रकारचा कोणताही बदल म्हणजे घटनादुरुस्ती ठरेल, असे महान्यायवादी आर. वेंकटरमाणी यांनी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सांगितले. त्यावर,गेल्या ७२ वर्षांत संसदेने यासंदर्भात कोणताही कायदा का आणला नाही, अशी विचारणा घटनापीठाने केली. यासंदर्भातील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

न्यायाधीशांच्या बदलीविरोधात वकिल एकत्र

गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या प्रस्तावित बदलीविरोधात उच्च न्यायालयांतील वकिलांनी विरोध केला. न्यायाधीश निखिल करियल यांची पाटणा उच्च न्यायालयात बदली करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या ‘न्यायवृंद’च्या शिफारशीला वकिलांचा विरोध आहे. नवीन निर्णयापर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे, असे वकिल संघटनेने सांगितले. सर्वसाधारणपणे न्यायाधीशांच्या बदलीपूर्वी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबरोबर चर्चा करण्यात येते, असे वकिलांनी सांगितले. तसेच हा प्रकार म्हणजे ‘न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा मृत्यू’ असेही त्यांनी म्हटले.