Kunwar Vijay Shah : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री कुंवर विजय शाह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेलं एक आक्षेपार्ह वक्तव्य मंत्री शाह यांना भोवलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या संदर्भात मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण असं संबोधलं होतं. कुंवर विजय शाह यांच्या या आक्षेपार्ह टिप्पणीवरून न्यायालयाने त्यांना चांगलंच फटकालं आहे. तसेच अशा प्रकारची टिप्पणी धोकादायक असल्याचं निरीक्षण नोंदवत त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने या संदर्भात असं निरीक्षण नोंदवलं की, प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरून कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेलं विधान हे फुटीरतावादी कारवायांच्या भावनांना प्रोत्साहन देणारं आणि भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

मंत्री कुंवर विजय शाह यांनी काय म्हटलं होतं?

मंत्री कुंवर विजय शाह यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून ते वादात अडकले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणार्‍यांना त्यांच्याच बहि‍णीच्या माध्यमातून धडा शिकवला असं कुंवर विजय शाह हे म्हणताना ऐकू येत आहे. यावरून मंत्री कुंवर विजय शाह हे कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलत होते, असा आरोप काँग्रेसने केला होता.

मंत्री कुंवर विजय शाह यांनी म्हटलं होतं की, “ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केलं त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच बहि‍णीच्या मदतीने धडा शिकवला. “(उनकी समाज की बहन के जरीये)”. दरम्यान, व्हिडीओमध्ये शाह हे अशा आशयाचे विधान तीन वेळा उच्चारताना दिसून आले होते. दरम्यान, त्यानंतर या संदर्भात स्पष्टीकरण देताना शाह यांनी म्हटलं होतं की, “माझ्या वक्तव्य वेगळ्या संदर्भात पाहिले जाऊ नये. मी लोकांना सांगू इच्छितो की माझे भाषण त्या संदर्भात नाही. त्या आपल्या बहि‍णी आहेत आणि त्यांनी सशस्त्र दलांसह मोठ्या ताकदीने बदला घेतला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसकडून सडकून टीका

काँग्रेसकडून त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मध्यप्रदेश काँग्रेसने मंत्री कुंवर विजय शाह यांच्या वक्तव्याला लज्जास्पद म्हटले. “भारताची मुलगी, जिच्यावर आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. हा भ्रमिष्ट आणि अज्ञानी मंत्री तिला दहशतवाद्यांची आणि त्यांच्या समाजाची बहीण म्हणत आहे”, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते अभिनव बरोलिया यांनी जोरदार टीका केली होती.