राजधानी दिल्लीमध्ये डेंग्यू या संसर्गजन्य आजाराची साथ पसरत चाललेली असल्यामुळे उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्याकडून डेंग्यू रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मागवली आहे.
मुख्य न्यायाधीश जी रोहिनी आणि न्या. जयंत नाथ यांच्या खंडपीठाने तीन महापालिकांसह नवी दिल्ली नगर परिषदेलाही जाब विचारला असून त्यांनाही उपाययोजनांबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि महापालिका आणि नगर परिषदेला नोटिस बजावली आहे. या नोटिशीला २४ सप्टेंबपर्यंत उत्तर देणे बंधनकारक त्यांना बंधनकारक असेल. दिल्लीत डेंग्युमुळे नुकतेच एका सात वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले होते. या मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवडिलांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुलावरील उपचारांसाठी नकार देणाऱ्या दवाखान्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिले. सात वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या घटनेनंतर कायद्याची विद्यार्थीनी गौरी ग्रोव्हर यांनी दवाखान्यांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. दवाखान्यांच्या निष्काळजीपणाबाबत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. याचिकाकर्त्यांने या प्रकरणाचा सखोल अभ्यात करून याचिका दाखल केल्याचे सांगताना न्यायालयाने संबंधितांना नोटिस बजावण्याचा निर्णय घेतला. दिल्ली सरकारचे वकिल राहुल मेहरा यांनी सरकारची बाजू न्यायासमोर मांडताना सांगितले की, डेंग्युवरील उपचारांसाठी सरकारकडून तातडीने पावले उचलण्यात आली असून रुग्णांसाठी सुविधा पुरविण्यात येत आहेत. मृत मुलांच्या आईवडिलांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्रही याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सादर केले.
खाटांची मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष
दिल्लीत डेंग्यूची तीव्रता वाढल्यामुळे दवाखान्यांमधील खाटांची मागणी वाढली असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी दवाखान्यांना संघर्ष करावा लागत आहे. तसेच, अधिक काम करावे लागत असल्यामुळे डॉक्टरांनीही तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तातडीने पावले उचलली आहेत. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे दिल्ली सरकारने ६०० नव्या खाटांची मागणी केली आहे. या खाटा जनकपुरी, अशोक विहार आणि ताहिरपूर येथील दवाखान्यांमध्ये देण्यात येणार आहेत. बारा हिंदूराव दवाखान्याचे अधिक्षक डॉ. व्हीके खुराणा म्हणाले की, नऊ वॉर्डमध्ये डेंग्यूचे रुग्ण ठेवण्यात आले आहेत. ९६० पैकी ३७० खाटा या रुग्णांना देण्यात आल्या आहेत. तर गुरु तेग बहादूर रुग्णालयातील डॉक्टरांकडून अधिक काम करावे लागत असल्यामुळे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
दिल्लीत डेंग्यूचे दोन हजार रुग्ण ; उपचार व्यवस्था अपुरी
नवी दिल्ली : नवी दिल्ली व आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून सरकारने कमी पैशात चाचण्या करण्याचे दिलेले आदेश रुग्णालयांनी धुडकावले आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे. गेल्या पाच वर्षांत दिल्लीत डेंग्यूचा हा सर्वात मोठा उद्रेक आहे व तेथे रुग्णांसाठी बिछाने व डॉक्टर्स कमी पडत आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी डेंग्यूला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या दोन हजारांच्या आसपास गेली आहे.
डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी दिल्ली सरकारने जनकपुरी, अशोक विहार व ताहिरपूर येथील रुग्णालयात ६०० खाटा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. ९६० खाटांपैकी ३७० डेंग्यूच्या सहाशे रुग्णांनी व्यापल्या आहेत. नऊ वॉर्डात डेंग्यूचे रुग्ण आहेत असे बारा हिंदूराव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. के. खुराणा यांनी सांगितले. गुरू तेगबहादूर रुग्णालयासह डॉक्टरांना अतिरिक्त वेळ काम करावे लागत आहे. दोन-तीन रुग्ण एका खाटेवर अशी परिस्थिती आहे. सध्या मर्यादित वॉर्डामध्ये डेंग्यू रुग्णांना घेतले जात आहे. सफदरजंग रुग्णालयात रुग्णांना जमिनीवर झोपवून सलाईन दिले जात आहे. दरम्यान सरकारने खासगी रुग्णालयात खाटांची क्षमता १० ते २० टक्के वाढवण्याचा आदेश दिला आहे. आतापर्यंत चौदाजण यात मरण पावले आहेत. १९०० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. अविनाश राऊत व अमन शर्मा यांचा डेंग्यूने गेल्या आठवडय़ात मृत्यू झाला होता. अविनाशच्या आई-वडिलांनी त्यामुळे आत्महत्या केली. दिल्ली सरकारने सर्व डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या सुटय़ा रद्द केल्या आहेत. त्यात परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.