राज्यसभा निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे हिमाचल प्रदेशची सध्या देशभर चर्चा चालू आहे. राज्यात मंगळवारपासून मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपाच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट होता. परंतु, तरीही भाजपाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाल्याने काँग्रेसचा पराभव झाला. परिणामी हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसवर आरोप करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर, दुसरीकडे भाजपाने राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली आहे. त्याचबरोबर, भाजपा आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातल्याने १५ भाजपा आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासांत राज्यात या तीन घडामोडी घडल्या आहेत. त्यापाठोपाठ विरोधकांनी आणखी एक दावा करत मोठा राजकीय स्फोट केला आहे.

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला की, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी राजीनामा सादर केला आहे. राज्याच्या राजकारणात चालू असलेली उलथापालथ पाहून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आपलं पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्वतः सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या सर्व वृत्तांचं आणि दाव्यांचं खंडण केलं आहे.

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भाजपा आमदार सभागृहात दाखल झाले. त्याचवेळी काही मार्शल तिथे आले आणि त्यांनी सर्व आमदारांना घेरलं. त्यानंतर मार्शल एकेका आमदाराला घेऊन बाहेर जाऊ लागले होते, असा दावा काही भाजपा आमदारांनी केला आहे. तसेच त्यांनी आरोप केला आहे की, मुख्यमंत्री विरोधकांविरोधात बळाचा वापर करू लागले आहेत. विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री म्हणाले, मी कुठल्याही प्रकारच्या बळाचा वापर केलेला नाही. उलट ते लोकच सैन्यबळाचा, सीआरपीएफचा वापर करत आहेत. ते लोक सर्व आमदारांना सीआरएफच्या गाडीत भरून कुठेतरी घेऊन जात आहेत. परंतु, अशाने मी घाबरणारा माणूस नाही. आजच्या अधिवेशनात बहुमत चाचणी होईल आणि या बहुमत चाचणीत काँग्रेस विजयी होईल. विधानसभा अध्यक्षांनी दुपारी दोन वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. त्यानंतर मी सर्व प्रसारमाध्यमांशी बातचीत करेन.

राजीनाम्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले, विरोधी पक्ष माझ्या राजीनाम्याची अफवा उडवत आहेत. जेणेकरून आमच्या आमदारांमध्ये अशांतता निर्माण होईल किंवा आमचे आमदार फुटतील. माझ्या राजीनाम्यानंतर पक्षातील लोक सोडून जातील असं त्यांना वाटत असावं. परंतु, काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. काही लहान-मोठ्या अडचणी आहेत ज्या लवकरच सोडवल्या जातील.

हे ही वाचा > हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय नाट्य; क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेस अडचणीत, भाजपाकडून बहुमत चाचणीची मागणी

काँग्रेसच्या मंत्र्याचा राजीनामा

सुखविंदर सिंग सुखू सरकारने आपल्याच आमदारांचा अनेक वेळा अपमान केला, असा आरोप करत काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी सकाळी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते पुढे म्हणाले, “आता हिमाचलमध्ये काँग्रेस पुढे कोठे आहे हे पक्षाच्या हायकमांडला ठरवायचे आहे. लोकांनी मतदान केले म्हणून ते सरकार वाचले पाहिजे अशी आमची इच्छा आहे.”