Adani Group On Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर अदाणी समूहाचे मुख्य आर्थिक अधिकारी जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी एका पोस्टच्या माध्यमातून हिंडनबर्गला टोला लगावला आहे.

एक्सवर केलेल्या एका ओळीच्या पोस्टमध्ये जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी, “कितने गाझी आये, कितने गाझी गये”, इतकेच लिहित हिंडनबर्गला लक्ष्य केले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी कंपनी अधिकृतपणे बंद करत असल्याची घोषणा केल्यानंतर सिंग यांनी ही पोस्ट केल्याने ती, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेक युजर्स आता प्रतिक्रियाही देऊ लागले आहेत. २०२३ मध्ये हिंडनबर्गने जाहीर केलेल्या आहवालामुळे अदाणी समूहाला अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते.

अदाणी समूहाचे मोठे नुकसान

हिंडेनबर्ग रिसर्चने २०२३ मध्ये अदाणी समूहाला वारंवार लक्ष्य केले होते. आपल्या अहवालातून हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांमुळे गौतम अदाणी यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. या आरोपांमुळे अदाणी समूहाच्या बाजार मूल्यात मोठी घसरण झाली होती. असे असले तरी नंतर अदाणी समूहाने शेअर बाजारातील त्यांचा तोटा भरून काढला होता. तसेच याबाबत अदाणी समूहाला अनेक आरोपांचा सामना करावा लागला होता. असे असले तरी, गौतम अदाणी आणि त्यांच्या कंपन्यांनी हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत.

हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याची घोषणा

हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी आज एक्सवर एक पोस्ट लिहून कंपनी बंद करत असल्याची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये नॅथन अँडरसन यांनी म्हटले होते की, “आम्ही जे काही ठरवले होते ते पूर्ण झाल्याने आता आम्ही कंपनी बंद करत आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नॅथन अँडरसन यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “भ्रष्टाचार, खोटेपणा, गैरव्यवहार यावर आम्ही पुराव्यांसह प्रहार केले. आम्ही असे लढे दिले आहेत जे कोणत्याही व्यक्ती किंवा साम्राज्यापेक्षा मोठे आहेत. कारण हे लढे सत्य समोर आणण्यासाठी होते. लबाडी, भ्रष्टाचार, नकारात्मकता याचा सुरुवातीचा परिणाम हा प्रभावीच वाटतो, पण सत्याची वाट आम्ही सोडली नाही, त्यामुळे ही वाटचाल करु शकलो. तसेच आम्ही काही साम्राज्यांना धक्के देण्याचे कामही केले आहे. आम्ही केलेल्या या कामामुळे किमान १०० व्यक्तींच्या विरोधात दिवाणी खटले दाखल झाले आहेत. ज्यामध्ये काही अब्जाधीश आणि उच्चभ्रूंचा समावेश आहे.”