Bangalore Hindi English Language Row: बंगळुरूत गुगलमध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्याला हिंदी भाषेमुळे पार्किंग नाकारल्याचा प्रकार घडला आहे. या अभियंत्यानं स्वत: एक्स अकाऊंटवर सविस्तर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. पोस्टवरून सध्या सोशल मीडियावर नेटिझन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. या अभियंत्यानं पोस्टमध्ये मातृभाषेबाबत आग्रह धरणाऱ्या राज्यांचा उल्लेख करताना भारतात इंग्रजी सक्तीची करण्याची मागणीही केली आहे.

नेमकं काय घडलं?

गुगलमध्ये काम करणारे अर्पित भयानी यांनी गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपलं वाहन पार्क करण्यासाठी बोलताना हिंदीचा वापर केला म्हणून आपल्याला पार्किंगची जागा नाकारण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.

“आज मी माझी कार पार्क करताना एका माणसाला हिंदीतून बाजूला सरकण्यास सांगितलं म्हणून मला गाडीच पार्क करू दिली गेली नाही. माझी त्याला हरकत नाही. पण मी काय सांगतोय त्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्र असो, कर्नाटक असो किंवा आणखी कुठलं राज्य असो, जे कुणी भाषेचं संवर्धन, संस्कृती रक्षण वगैरेच्या गप्पा करतात, ते त्यांच्या मुलांना कुठल्या शाळेत घालतात? तुमची प्रादेशिक भाषा शिकवणाऱ्या शाळेत की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत?” असा सवाल भयानी यांनी उपस्थित केला आहे.

“इंग्रजी सक्तीची करा”

“आपल्या सगळ्यांच्या अवतीभवती इंग्रजीच आहे. मग इंग्रजी सक्तीची भाषाच का करू नये? इथे मी असं म्हणत नाहीये की प्रत्येकानंच या भाषेत बोललं पाहिजे. पण इंग्रजी एक अशी भाषा ठरू शकते, जी प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात माहिती आहे आणि कुणी बोललं तर ते चालूही शकणार आहे. यामुळे आपलं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं”, असा मुद्दा अर्पित भयानी यांनी मांडला आहे.

इतर महत्त्वाच्या समस्यांचं काय?

दरम्यान, भाषेचा मुद्दा हातावेगळा झाल्यास, आपल्याला इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करता येईल, असं भयानी यांनी नमूद केलं आहे. “आपण पायाभूत सुविधा, रोजगार, नोकऱ्या, शिक्षण, संशोधन, शोध, स्वच्छता, वातावरण बदल, आरोग्य, भ्रष्टाचार, शहर नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देऊ शकतो. आपल्याकडे अशा समस्या खूप आहेत”, असं ते म्हणाले.

नेटिझन्सचे भयानींना उलट प्रश्न!

दरम्यान, एका युजरनं अर्पित भयानींना “तुम्ही मग सुरुवातीलाच इंग्रजीतून का नाही बोललात?” असा प्रश्न केला. त्यावर “मी हिंदीनंतर त्याच्याशी इंग्रजीतूनही बोलायचा प्रयत्न केला. पण ज्या क्षणी मी हिंदीतून बोललो, त्या क्षणी त्याच्यासाठी विषय संपला होता. मी मग गपचूप माझी कार १५ मीटर लांब जाऊन पार्क केली आणि कामावर गेलो. मला तो वाद वाढवायचा नव्हता, आयुष्यात खूप कामं आहेत”, असं उत्तर त्यांनी दिलं.

SBI बँकेतील ‘त्या’ महिला पदाधिकाऱ्याची बदली

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एसबीआय बँकेच्या एका शाखेत एका महिला पदाधिकाऱ्याने ग्राहकाशी कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिला होता. त्यावरून बराच वाद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला. सदर महिला अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.